Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar  Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Reaction: ऐतिहासीक विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Pune News : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासीक विजय झाला आहे. विसाव्या फेरीअखेर त्यांनी ११ हजार ४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. धंगेकरांना त्यांचा विजय झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या विजयानंतर धंगेकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,''मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी जपण्याचा प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील काम करणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून गिरीश बापट यांच्याही भेटीला जाणार आहे'', असं ते म्हणाले.

''पैशांचा वापर होऊनही जनतेनं मतदानाच्या रुपाने मला आशीर्वाद दिला आहे. भाजपने जिंकण्यासाठी शेवटची शक्ती म्हणून त्यांनी हिंदुत्वाचं कार्ड काढलं होतं. पण मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं हिंदुत्व होतं. मी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे'', असं धंगेकर म्हणाले.

दरम्यान, कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अनेक नेत्यांनी पुण्यात तळ ठोकला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही प्रचारात उतरले होते. मात्र, तरी देखील भाजपचा पराभव झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT