Ajit Pawar-Nana Patole
Ajit Pawar-Nana Patole Sarkarnama
पुणे

बंडखोर शिवसेना आमदार, कॉंग्रेस ठरवताहेत अजितदादांना ‘व्हिलन’

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबतची (NCP) आघाडी नैसर्गिक नाही. या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, अशी भूमिका मांडणाऱ्या बंडखोर शिवसेना (Shivsena) आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief Minister Ajit Pawar) यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यात पद्धतीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून कॉंग्रेस ( Congress) आमदारांना त्रास झाल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. सरकार पडण्याची स्थिती आली असताना या साऱ्याला अजित पवार यांना जबाबदार धरून त्यांना ‘व्हिलन’ बनविण्यात येत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. मुळात त्यांच्याबरोबरची आघाडी अनैसर्गिक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुळे शिवसेना आमदारांना काम करताना अडचणी येत आहेत. शिवसेनेच्या आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुय्यम वागणूक मिळत होती, असा आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही अजित पवार यांच्यामुळे काँग्रेसचे आमदारांना त्रास होत होता. कामात अडचणी येत होत्या असा आरोप केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील दोन घटकांनी अजित पवार यांना दोष द्यायला सुरवात केली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर विस्तार करण्यास प्राधान्य देण्यात येत होते.प्रत्येक मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल यावर अजित पवार यांचा भर होता. आमदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभूत झालेल्या उमेदवाराचे काम ते तातडीने मार्गी लावत. या उलट याच मतदारसंघातील शिवसेनेच्या अथवा काँग्रेसच्या आमदाराचे काम अशा गतीने होत नाहीत हा या साऱ्या आरोपांमागील सूर आहे.

या सरकारचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होत असल्याची चर्चा नेहमीच दबक्या आवाजात होत असते. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना सत्तेचा फारसा फायदा होत नसल्याची भावना यातून वारंवार व्यक्त होताना दिसत आहे. या साऱ्‍या पार्श्वभूमीवर आता सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली असताना गेल्या अडीच वर्षाच्या कारभारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘व्हिलन’ ठरवण्यात येत असल्याचे सध्याच्या आरोपांवरून स्पष्ट होत होत आहे.

राष्ट्रवादी मुळे अनेक अडचणी येत होत्या, हा या एकूण चर्चेचा सूर होता. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याने भर पडली आहे. मुळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत काम करणे शक्य नाही. या दोन पक्षांपासून फारकत घेण्यात यावी, अशी मागणी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली आहे. गेली दोन-अडीच वर्षे सरकार स्थापन झाल्यापासून सर्व आमदारांची हीच भावना होती. मात्र, तब्बल अडीच वर्षानंतर या भावनेला वाट करून देण्याचा प्रयत्न या आमदारांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT