NCP Pune Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीच्या उपसरपंचांचा राजीनामा कोणी स्वीकारेना; सरपंचांनंतर बीडीओंनी केले हात वर!

उपसरपंचांनी दिलेला राजीनामा सरपंचांकडून स्वीकारला जात नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये विशेषतः या पदासाठी इच्छूक असलेल्यांत अस्वस्थता पसरली आहे.

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील न्हावरे (ता. शिरूर) या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) उपसरपंचपदाच्या राजीनामानाट्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. उपसरपंचांनी दिलेला राजीनामा महिना होत आला तरी सरपंचांकडून स्वीकारला जात नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये विशेषतः या पदासाठी इच्छूक असलेल्यांत अस्वस्थता पसरली आहे. (Resignation of Nhavare village Deputy sarpanch was not accepted after a month)

न्हावरेच्या उपसरपंच कविता दादासाहेब बिडगर यांनी घरगुती कारणास्तव २२ फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच कार्यालयात दिला. सरपंच अलका बिरा शेंडगे या त्यावेळी उपस्थित नसल्याने ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी तो घेतला. मात्र, महिना होत आला तरी सरपंच शेंडगे यांनी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाकारला नसल्याने गावपातळीवर राजकीय पेच निर्माण झाला आहे.

सरपंचांकडून राजीनामा स्वीकारला जात नसल्याने उपसरपंच बिडगर यांनी आठ मार्च रोजी पंचायत समितीकडे रजिस्टर पोस्टाने राजीनामा पाठवून दिला. त्याबाबत दोन वेळा पत्रव्यवहारही केला. मात्र, त्यानंतरही पंचायत समिती स्तरावरूनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये विशेषतः या पदासाठी इच्छूक असलेल्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर शिरूर बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतराव कोरेकर, न्हावरेचे माजी सरपंच गौतम कदम, माजी उपसरपंच जयवंतराव कोकडे, ग्रामपंचायत सदस्य गोरख तांबे, न्हावरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अमोल गावडे, युवा नेते दीपक कोकडे, गोरख भोंडवे, शहाजी पवार, बजरंग मारणे यांनी शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांची भेट घेऊन गावची राजकीय स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर नलावडे यांनीही कानावर हात ठेवत ‘हा अधिकार मला नसल्याचे’ या ग्रामस्थांसमोर स्पष्टपणे सांगितल्याने या राजकीय पेचाचे त्रांगडे आणखीनच वाढले आहे.

न्हावरे गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटांतील हेवेदाव्यातून निर्माण झालेल्या या राजकीय पेचप्रसंगातून मार्ग न निघाल्यास काही ग्रामस्थ थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते. सत्तेच्या सुंदोपसुंदीतून हा पेचप्रसंग निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेक जुन्या ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. एकूण १७ सदस्यसंख्या असलेल्या न्हावरे ग्रामपंचायतीत सत्ताधारी व विरोधी गटांचे तोडीस तोड संख्याबळ असल्याने दोलायमान स्थिती उभी राहिली असून पुढेही हा पेचप्रसंग कायम राहू शकतो, असे चित्र आहे. उपसरपंचांचा राजीनामा घेतल्यास नवीन उपसरपंचपद निवडीत आपल्या गटाला हार पत्करावी लागेल, अशी धास्ती असल्यानेच बिडगर यांचा उपसरपंचपदाचा राजीनामा ताटकळत ठेवला असल्याची चर्चा गावच्या राजकीय पटलावर चर्चिली जात आहे.

'उपसरपंचांचा राजीनामा स्वीकारावा की नाकारावा ही सर्वस्वी सरपंचांच्या अधिकारातील बाब आहे. त्यात निर्णय घेण्याचे अधिकार मला नाहीत', असे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी न्हावरे गावच्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपसरपंचांना घरगुती अडचणी आहेत, त्यांच्या राजीनामापत्रातही त्यांनी ते नमूद केले आहे. त्यांना त्या पदावर काम करता येणे शक्य नाही, शिवाय त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलेला आहे. असे असताना त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांच्यावर सक्तीने काम करण्याची जबाबदारी सोपविणे हा सरपंचांचा मनमानी कारभार आहे. या प्रकरणी त्यांनी कर्तव्यात कसूर केला असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यावर प्रशासनाने कार्यवाही केली पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT