RSS - BJP
RSS - BJP Sarkarnama
पुणे

RSS BJP Rift : भाजप अन् संघामध्ये नक्की काय घडतंय? भाजपचे प्रमुख पराभूत उमेदवार मोतीबागेत

सरकारनामा ब्यूरो

Pune BJP News: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघात भाजपविषयी असंतोषाची भावना दिसून आली. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या मुखपत्रातून आणि संघ परिवारातील काही सदस्यांकडून भाजपावर टीका करण्यात आली आहे.

लोकसभेत राज्याच्या पश्चिम भागातील भाजपचे प्रमुख पराभूत उमेदवार पुण्यात संघाचे पश्चिम प्रांत मुख्यालय असलेल्या मोतीबागेत बैठकीला उपस्थित होते. संघाशी फारशी जवळीक नसलेले हे नेते मोतीबागेत आल्याने भाजपा आणि संघामध्ये नक्की काय घडतंय? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका बसला आहे. त्याची अनौपचारिक चर्चा यात झाली. भाजपचे उमेदवार नेमके कुठे कमी पडले, काय चुकले आणि कशामुळे जनतेने भाजपला मत दिले नाही याचे आत्मचिंतन बैठकीत करण्यात आले.

महिनाभरात संघापासून भाजप दूर गेल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जाहीर वक्तव्य केले. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघ दूर गेल्याच्या चर्चेचा फुगा या बैठकीने फोडला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार डॉ.भारती पवार, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राम शिंदे, माजी आमदार बाळा भेगडे आदी बैठकीला उपस्थित होते.पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर आणि नाशिक भागातील प्रतिनिधींचा सहभाग होता.

गेल्या अनेक वर्षापासून भाजपला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची साथ लाभली आहे. संघाच्या विचारधारेवर चालणारा पक्ष अशी भाजपची ओळख आहे. संघाचे स्वयंसेवक नसलेले उमेदवार मोतीबागेत येतात, त्यावरून संघ हाच प्रमुख आधारस्तंभ असल्याचा संदेश यातून मिळाला.

भाजप आता मोठा झाला आहे. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीची गरज नाही’, असे विधान जे. पी. नड्डा यांनी केल्यानंतर महिनाभराच्या आतच संघाने राज्यातील ताकद पुन्हा दाखविण्यास सुरवात केली. त्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार मोतीबागेत आले असल्याचे सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT