Rupali Chakankar Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar : 'काळजीवाहू ताई ' आज रस्त्यावर कशा उतरल्या ? चाकणकरांनी खासदार सुळेंना डिवचलं

Chaitanya Machale

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून अजित पवार हे महत्वाच्या नेत्यांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे - फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट यांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बुधवारी (ता.24) ईडीकडून चौकशी करण्यात आली. यासाठी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर ईडीच्या कार्यालयापर्यंत गेल्या होत्या. त्यावर अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली आहे. चाकणकर यांच्याकडे अजित पवार गटाने महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देखील दिलेली आहे.

खासदार सुळे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी टीका केली आहे. आज रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मला हा प्रश्न पडतो की, जेव्हा आदरणीय अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकश्या सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले..?? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाही..?, तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे वाटले नाही का..?

केवळ आदरणीय अजितदादाच नाहीत तर जयंत पाटील,अनिल देशमुख ,छगन भुजबळ , नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या वेळेस देखील कधीही मोर्चे काढले नाहीत. पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा, असे तुम्हाला वाटले नाही का...?

अजितदादांनी वेगळा निर्णय घेतल्याची 100 खोटी कारणे तुम्ही देत असाल, परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब म्हणून मानत नाही हे देखील तितकेच विदारक सत्य आहे, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी खासदार सुळे यांच्यावर टीका केली आहे.

यापूर्वी देखील चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला होता. सुप्रिया सुळे या अजित दादांच्या कृपेमुळेच खासदार झाल्या आहेत. हे त्यांनी विसरू नये, असेही चाकणकर म्हणाल्या होत्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT