Sameer Wankhede Sarkarnama
पुणे

Sameer Wankhede Joins BJP: समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार? 'या' मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

ड्र्ग्ज सेवन प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याच्या मुलगा आर्यन खानला वानखेडे यांनी अटक केली होती

सरकारनामा ब्युरो

BJP News: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याला कारणही तसेच मानले जात आहे. समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी रविवारी (१९ मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. (Sameer Wankhede to join BJP; He will contest the election from this constituency)

इतकेच नव्हे तर दोघांनीही केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली. क्रांती रेडकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या भेटीचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे आता भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातून येऊ लागल्या आहेत.

दोन वर्षापूर्वी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर झालेल्या पार्टीत वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने बॉलीवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. या कारवाईमुळे समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते.कोरोना काळातही ड्रग्ज प्रकरणात अनेक धाडी टाकून वानखेडेंनी आपला दरारा निर्माण केला होता. तर आर्यनलाही अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते.

पण कारवाईनंतर त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. समीर वानखेडे यांनी जाणीवपूर्वक आर्यन खानला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यनला केलेली अटक म्हणजे एक कट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वानखेडेंना नामुष्कीचा सामना करावा लागला होता. इतकेच नव्हे तर वानखेडेंनी नवी मुंबईतील अवैधरित्या मिळवलेल्या बार परवान्याचे प्रकरणही समोर आले. या सर्व प्रकरणामुळे वानखेडेंची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

दरम्यान, दिवाळीमध्ये एका वृत्तपत्राच्या वाशिम आवृत्तीमध्ये समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तेव्हाही समीर वानखेडे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यानंतर आता समीर वानखेडेंनी थेट भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याने आता त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

राजकीय अभ्यासकांच्या मते, वाशीम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वानखेडे हे वाशीम जिल्ह्यातून निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकतात. विशेष म्हणजे वाशिम हा मतदार संघ भाजपचाही बालेकिल्ला आहे. त्यामुळे समीर वानखेडे या वाशिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT