दौंड (जि. पुणे) : दौंड (Daund) येथे भीमा नदी पात्रात वाळूचोरी केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यातील गार (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतीचे दोन सदस्य आणि दौंड नगरपालिकेच्या एका माजी नगरसेवकासह एकूण १४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन संशयित आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केली असून अन्य अकरा आरोपी फरारी आहेत. (Sand theft : case registered against former corporator & two members of Gram Panchayat)
दौंड पोलिस आणि महसूल खात्याने संयुक्तपणे २५ मार्च रोजी केलेल्या कारवाईत वाळूचोरीसाठी वापरण्यात आलेले १ कोटी ३३ लाख २५ हजार रूपये मूल्य असलेल्या २० यांत्रिक बोटी नष्ट करून ६५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. पण, कारवाईची पूर्वसूचना मिळाल्याने महसूल प्रशासन व पोलिसांना कारवाई दरम्यान एकही वाळूचोर किंवा साधा मजूर देखील हाती लागला नव्हता. पोलिसांनी या प्रकरणी गार ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीकांत उर्फ गोट्या मगर, प्रशांत मगर (दोघे रा. गार, ता. श्रीगोंदा, जि. नगर), दौंड नगरपालिकेचा माजी नगरसेवक अण्णासाहेब जगताप याच्यासह चिक्या सोनवणे, बिया सोनवणे, राज सोनवणे, संजय सोनवणे, मिलिंद जगताप, मुकेश सोनवणे, अमोल जगताप, वैभव सोनवणे, नवनाथ जगताप, किशोर शेलार (सर्व रा. भीमनगर, दौंड) व प्रशांत भालेराव (रा. दौंड) या चौदा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
सर्व संशयित आरोपींविरूध्द भारतीय दंड विधान, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि खाण व खनिज अधिनियम १९५७ मधील कलामान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी मुकेश सुधाकर सोनवणे (वय ५०), किशोर विठ्ठल शेलार (वय ३५) व नवनाथ अप्पा जगताप (वय ३४, तिघे रा. भीमनगर, दौंड) या तिघांना अटक केली आहे.
नवनाथ जगताप हा दौंड शहर भाजप अनुसूचित जाती आघाडीचा शहराध्यक्ष असून त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा लेखी दावा शहर भाजपने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.