Sunetra pawar, Sangram thpote, Supriya sule  Sarkarnama
पुणे

Sangram Thopte News : संग्राम थोपटेंची साथ, ताई की वहिनीला ? थेटच सांगितले...

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे कोणाच्या बाजूने उभे राहणार याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्य घेणे आवश्यक आहे. हे मताधिक्य घेण्यासाठी स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संभाव्य उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

दोन्ही गटाकडून घेण्यात आलेल्या भेटीमुळे संग्राम थोपटे हे कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. याबाबत आता संग्राम थोपटे यांनी खुलासा केला आहे. भोरमध्ये शनिवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह संग्राम थोपटे हे उपस्थित होते. (Sangram Thopte News)

यावेळी थोपटे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून माझ्या राजकीय भूमिकेबाबत महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, मी या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला लावलेल्या उपस्थितीमुळे सगळ्यांचा संभ्रम दूर झाला असेल.

गेल्या काही काळापासून पक्ष सोडावा म्हणून अनेक जण पाण्यात देव ठेऊन बसले आहेत. दरम्यानच्या काळात अनेक याद्या आल्या याद्यांच्या निमित्ताने मी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यानंतर मला जिल्ह्यातून, राज्यातून फोन यायचे तुम्ही कधी पक्ष सोडणार आहात? तुमच्या बरोबर कोण कोण पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहे? तुम्ही नाराज आहात का? प्रश्न विचारण्यात येत आहेत. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या प्रश्नांना उत्तर देऊन मी बेजार झालो असल्याचे थोपटे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक महिन्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे या आमच्या कुटुंबीयांच्या भेटीला आल्या होत्या. या भेटीनंतर मला काही लोकांचे फोन आले की तुमची भूमिका काय आहे? काय चर्चा झाली? अशी विचारणा झाली. काल देखील सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्यानंतर देखील यासारख्याच विचारणा मला होत आहेत. मात्र, या मेळाव्याच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला मी हे चित्र दाखवून देऊ इच्छित आहे की, मी महाविकास आघाडीसोबतच आहे. या आघाडी सोबतच राहणार असल्याचं थोपटे यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांच्या उपस्थितीत 9 मार्चला महामेळावा

आतापर्यंतच्या जेवढ्या काही निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र लढल्या आहेत. त्या-त्या निवडणुकांना मी आघाडी धर्म पाळून उमेदवाराला विजयी करण्यासाठी ताकद लावली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक ही स्वाभिमानाची निवडणूक असणार असून या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये मी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत असणार असल्याचे स्पष्टीकरण थोपटे यांनी यावेळी दिले. त्यासोबतच 9 मार्चला भोर विधानसभा मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा घेणार असल्याचे देखील थोपटे (Sangram Thopte) यांनी सांगितले.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT