Sangram Thopte  Sarkarnama
पुणे

PDCC Bank Election : ​पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट! भोरमध्ये 'थोपटे विरुद्ध थोपटे' सामना?

Sangram Thopte vs Nitin Thopte : संग्राम थोपटेंनी सलग तीन वेळा बँकेत प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन थोपटेंनी दंड थोपटलेत.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भोर तालुका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण यावेळी सामना फक्त भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा नाही. तर भोरमध्ये रंगण्याची शक्यता आहे ती थेट ‘थोपटे विरुद्ध थोपटे’ अशी! एकीकडे सलग तीन वेळा जिल्हा बँकेच्या ‘अ’ गटातून निवडून आलेले माजी आमदार संग्राम थोपटे आणि दुसरीकडे त्यांच्याच नावाचे नितीन थोपटे, जे राष्ट्रवादीकडून या गटात आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहेत. पण नितीन थोपटेंच्या या एन्ट्रीमागे आणखी एक नाव चर्चेत आहे... आमदार शंकर मांडेकर!

भोरच्या राजकारणात थोपटे कुटुंबाचं वर्चस्व काही आजचं नाही. माजी मंत्री अनंतराव थोपटे हे भोरचे तब्बल सहा वेळा आमदार राहिले. सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव होता आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक वर्षे थोपटे कुटुंबाची पकड राहिली. याच राजकीय वारशातून संग्राम थोपटे पुढे आले. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ते भोरमधून आमदार झाले. आता विधानसभेच्या राजकारणात समीकरणं बदलली आहेत. २०२४ मध्ये संग्राम थोपटेंचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपच्या ताकदीवर ते पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा मैदानात उतरत आहेत.

पण संग्राम थोपटेंसमोरचं आव्हानही कमी नाही. पुणे जिल्हा बँकेच्या ‘अ’ गटातील एकूण ७५ संस्थांपैकी ७४ संस्थांचे प्रतिनिधी ठराव प्राप्त झाले आहेत. यातील ६२ ठरावांवर भाजप समर्थित प्रतिनिधी असल्याचा दावा केला जात आहे. हा आकडा संग्राम थोपटेंच्या बाजूने दिसतो. म्हणजे कागदावरचं गणित पाहिलं, तर सध्या संग्राम थोपटेंचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. पण. राजकारणात फक्त आकडे पुरेसे असतात का? भोरमध्ये याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

कारण आता या मैदानात उतरले आहेत नितीन थोपटे. नितीन थोपटे हे भोरच्या सहकार आणि स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. दूध संघाच्या राजकारणातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता नितीन थोपटे ‘अ’ गटातून उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थोपटे विरुद्ध थोपटे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इथेच खरी राजकीय स्टोरी सुरू होते. कारण २०२४च्या विधानसभा निवडणुकीत शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंचा पराभव केला. त्यानंतर संग्राम थोपटे भाजपमध्ये गेले. पण भोरच्या राजकारणात मांडेकर आणि थोपटे यांच्यातील राजकीय स्पर्धा संपलेली नाही. उलट, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही स्पर्धा सहकाराच्या मैदानात येताना दिसतेय. नितीन थोपटे यांना ताकद देऊन संग्राम थोपटेंसमोर आव्हान उभं करता आलं तर मांडेकरांसाठी हा केवळ एका बँक निवडणुकीचा विषय राहणार नाही. भोरच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईतही त्याचा संदेश जाऊ शकतो.

यासाठी भोर पंचायत समितीचं अलीकडचं राजकारणही महत्त्वाचं आहे. २०२६ मध्ये पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी चार सदस्य होते. सभापतीपदाची निवड चिठ्ठीद्वारे झाली आणि राष्ट्रवादीच्या मनीषा कंक यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. म्हणजेच भोरमध्ये काट्याची राजकीय लढत देण्याची क्षमता राष्ट्रवादीकडे असल्याचं या उदाहरणातून दिसून येतं. आता हाच फॉर्म्युला जिल्हा बँकेत कितपत चालतो? याकडे लक्ष लागलं आहे.

संग्राम थोपटे, थोपटे कुटुंबाचा दीर्घ सहकार वारसा, अनेक वेळा जिल्हा बँकेचं प्रतिनिधित्व आणि ‘अ’ गटातील ६२ ठरावांवर भाजप पुरस्कृत प्रतिनिधी असल्याचा दावा आहे. दुसरीकडे नितीन थोपटे यांना राष्ट्रवादीची साथ आणि शंकर मांडेकरांची राजकीय ताकद. त्यामुळे ही निवडणूक आता फक्त एका संचालकपदाची लढाई राहिलेली नाही. ही लढाई आहे भोरच्या सहकार क्षेत्रावर कोणाचं वर्चस्व राहणार याची! आणि सर्वात मोठा प्रश्न संग्राम थोपटेंच्या बालेकिल्ल्यात नितीन थोपटे किती मोठं आव्हान उभं करणार? की ठरावांचं गणितच संग्राम थोपटेंना पुन्हा जिल्हा बँकेत घेऊन जाणार? भोरमध्ये या ‘थोपटे विरुद्ध थोपटे’ लढतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

भोर तालुका : PDCC निवडणूक स्थिती

- अ गट : ७५ पैकी ७४ ठराव

- ब गट : ३ पैकी २ ठराव

- क गट : २९ पैकी २५ ठराव

- ड गट : ७७ पैकी ५५ ठराव

- एकूण : २०२ पैकी १५६ ठराव

- प्रलंबित : ४६ संस्थांचे ठराव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT