Sanjay Raut-Raj Thackeray
Sanjay Raut-Raj Thackeray Sarkarnama
पुणे

संजय राऊतांची खोचक टीका : भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut in Pune) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता येथे जोरदार टीका केली. शिवसैनिकांच्या खांद्यावर भगवा आहे तो ओरिजनल आहे तो तात्पुरता नाही, असा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील सरकारला त्रास देण्यासाठी भाड्याची माणसे घेता. त्या भाड्याच्या माणसाच्या अंगावर भगवी शाल टाकता आणि या भगव्याचा अपमान करता, अशा शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला. (Sanjay Raut Criticizes Raj Thackeray in Pune)

हडपसर येथे झालेल्या मेळाव्यता राऊत यांनी शिवसैनिकांच्या अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा इशारा दिला.सेनेला संपवण्यासाठी भाजपकडून सुपाऱ्या दिल्या जातात आणि त्या स्वीकारल्या जातात, असाही आरोप त्यांनी केला.

सवाल ये नही की बस्तियां किस्ने जलाई

सवाल ये हे की बंदर के हाथ में माचिस किस्ने दी

हा शेर उद्धृत करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. गेली १५ वर्षे भोंग्याचा त्रास झाला नाही. मग आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतरच त्रास क काय सुरू झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भोंग्याचा त्रास पोटदुखीतून सुरू झाला आहे. पण काळजी नसावी उद्धव ठाकरे आणि सरकार हे सगळ्या उपचारांवर मात करायला सक्षम आहे, असेही त्यांनी सांगितले. जिवंतपणे ज्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला ते आम्हाला सांगत आहेत, असाही टोला त्यांनी राज यांना लगावला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत झालेल्या मारहाणीबद्दल त्यांनी मत व्यक्त केले. पुणे महापालिकेच्या पायरीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मनगटातील ताकद दाखवली, त्याचा अभिमान आहे. त्याचा (सोमय्या यांचा) कार्यक्रम पुढे वाढला असता. आपण काय घाबरतो क, अशीही आव्हानात्मक भाषा त्यांनी वापरली.

स्वतः शेण खायचं आणि आमच्या तोंडाचा वास घ्यायचा, अशी भाजपची वृत्ती आहे. भाजपची सत्ता असलेल्या पुणे, नागपूर या महापालिकांत किती भ्रष्टाचार झाला? पण देवेंद्र फडवणिसांचे लक्ष त्याकडे कुठे आहे? मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याची बोंब ते मारतात. पण मुंंबई महापालिकेवरचा भगवा झेंडा मराठी माणसाने 50 वर्षे खाली ठेवू दिला नाही. यातच शिवसेनेच्या कारभाराची पावती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आता शिवसेनेने मुंबई आणि ठाणे यापुरतेच राहायचे नाही. आता पुण्यात आपली सत्ता आणायची आहे. शिवसेना पुण्यात सत्ता स्थापन करेन, असा आत्मविश्वास बाळगा. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे कोणाला वाटले होते का? पण हा विश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. त्यानुसार उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच आत्मविश्वासाने आता कामाला लागा, असाही सल्ला त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT