Mohan Bhagwat  Sarkarnama
पुणे

Mohan Bhagwat In Pune: सरसंघचालक मोहन भागवत शहरात अन् सामाजिक कार्यकर्ते भापकर पोलिसांच्या नजरकैदेत

Mohan Bhagwat visit to Pune: सरसंघचालकांच्या जेवणासाठी सामाजिक कार्यकर्त्याला अर्धा दिवस पोलिसांच्या ताब्यात रहावे लागले...

उत्तम कुटे

पिंपरी : देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या व्हीव्हीआयपी एवढी सुरक्षा व्यवस्था(झेड प्लस) असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत हे पुण्याच्या खासगी दौऱ्यावर काल (मंगळवारी) रात्री आले आहेत.

संघाच्या शिरस्त्यानुसार स्वयंसेवकाच्या घरी जेवायला ते आज सकाळी पिंपरीत आले होते. त्याची खबरदारी म्हणून शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांना अर्धा दिवस पोलिसांनी नजरकैद केले होते.

पुण्यात कोथरुड येथील कार्यक्रमासाठी भागवत आलेले आहेत. संदीप जाधव या स्वयंसेवकाच्या पिपंरीतील घरी ते जेवायला आज सकाळी साडेअकरा वाजता आले होते. त्यांच्यासाठी खास कोकणी मेन्यू होता. तासभर ते जाधव यांच्या घरी होते. दुपारी ते गेले.

त्यानंतर भापकर यांना पोलिसांनी सोडले. त्यानंतर त्यांनी या दडपशाहीबद्दल `सरकारनामा`शी बोलताना संताप व्यक्त केला. या दौऱ्याची पुसटशीही कल्पना नसल्याने आंदोलन करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, तरीही पोलिसांनी सकाळीच प्रथम घरातच नजरकैद केले. नंतर पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि दुपारपर्यंत स्थानबद्धतेत ठेवले, असे ते उद्वेगाने म्हणाले.

पाच वर्षापूर्वी भापकर यांनी भागवत यांच्या चिंचवडमधील कार्यक्रमाप्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला होता. तो ध्यानात घेऊन पोलिसांनी ही प्रतिबंधक उपाययोजना आज केल्याचे समजले. ती आठवण सांगताना भापकर म्हणाले, २०१८ मध्ये चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भागवतांचा कार्यक्रम होता. त्यावेळी जेम्स लेन याच्या "द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या वादग्रस्त ग्रंथातील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांविषयीचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकावा आणि माफी मागावी, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

कारण हे पुस्तक लिहिण्यासाठी लेनला संघ विचाराचे कै.बाबासाहेब पुरंदरे व संघाच्या संबंधित इतर काही लोकांनी सहकार्य केलं होतं. मात्र, त्यावेळी भाजप व संघाच्या मंडळींनी आंदोलन करू नये, सरसंघचालकांशी प्रत्यक्ष भेट घालून देतो, असे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित केले.

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी भागवतांची भेट झाली तेव्हा त्यांनी लेखी म्हणणे देण्यास सांगितले. ते दिले. नंतर कार्यक्रम झाल्यावर ते निघून गेले. त्यानंतर आतापावेतो त्यांनी कुठलेही उत्तर आमच्या पत्राला वारंवार विचारणा केल्यानंतरही दिलेले नाही. म्हणून संघाच्या या खोटारडेपणाचा व दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहे, असे भापकर म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT