Pranita Khomne
Pranita Khomne Sarkarnama
पुणे

Someshwar Sugar Factory : महिला मंत्र्यांवरून शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल करणाऱ्या अजितदादांनी ‘सोमेश्वर’मध्ये करून दाखवलं!

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : बारामती (Baramati) तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Someshwar Sugar Factory) उपाध्यक्षपदी प्रणिता मनोज खोमणे (Pranita Khomne) यांची निवड करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी परिसराला सुखद धक्का दिला. कारखान्याच्या ५१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेस पदाधिकारी होण्याचा सन्मान मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या निवडीतून महिला धोरण आणि मागास घटकाला संधी, अशा दोन्ही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. (Selection of Pranita Khomne as Vice President of Someshwar Sugar Factory)

सोमेश्वर कारखान्याचे मावळते उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवरील निवड प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय संचालक मंडळास कळविला. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळे यांच्या उपस्थितीत प्रणिता खोमणे यांचा एकमेव अर्ज आला आणि त्या बिनविरोध उपाध्यक्ष ठरल्या.

निवडीनंतर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, शिवाजीराव राजेनिंबाळकर, विश्वास जगताप, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, अभिजित काकडे, किसन तांबे, बाळासाहेब कामथे, कमल पवार, शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव उपस्थित होते.

नागपूर अधिवेशनात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, यावरून धारेवर धरले. फडणवीस यांनी गंभीरपणे घेत विस्तार करताना पहिली मंत्री महिला असेल असा शब्द दिला. पवार यांनीही केवळ वादासाठी मुद्दा उपस्थित केला नाही, तर आपल्या नेतृत्वाखालील सोमेश्वर कारखान्यासारख्या नामांकित कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा ५१ वर्षांत पहिल्यांदा खोमणे यांच्या रूपाने एका सक्षम महिलेवर सोपवत पक्षाचे महिला धोरण कृतीद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागास घटकांना सामावून घेण्याची संधी साधली आहे.

कोऱ्हाळे खुर्द गावालाही खोमणे यांच्या रूपाने पहिलेच उपाध्यक्षपद मिळाले आहे. याआधी शेजारी कोऱ्हाळे बुद्रुक गावाला रामभाऊ भगत, सुनील भगत, लालासाहेब माळशिकारे असे तीन उपाध्यक्ष मिळाले होते.

माहेर-सासरचा राजकीय वारसा

प्रणिता खोमणे यांच्या सासूबाई चंपाबाई खोमणे या सोमेश्वर कारखान्यावर २००७ ते २०१५ कालावधीत संचालक होत्या, तर सासरे बबनराव खोमणे कोऱ्हाळे खुर्द गावचे सरपंच होते. तर खांडज हे माहेर माळेगाव कारखान्याशी संबंधित आहे. त्यांचे वडील विलासराव आटोळे मागील संचालक मंडळात होते. दोन्ही घराण्याचा राजकीय वारसा त्या समर्थपणे चालवत आहेत. त्या स्वतःही कोऱ्हाळे खुर्दच्या २०१३ ते २०१८ मध्ये सरपंच होत्या आणि जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कारही त्यांनी पटकावला होता. सुमारे २१ महिला बचत गट उभारण्यात त्यांचे योगदान आहे. सध्याचे सरपंच गोरख खोमणे यांच्याही त्या भावजय आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT