Pune Crime News: आर्थिक व्यवहारातून दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मार्केट यार्डमधील एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, गुन्हे शाखेने कौशल्य पणाला लावत अवघ्या २४ तासांत अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडी परिसरातील एका व्यापाऱ्याचे २४ मार्च रोजी टिंबर मार्केटमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याला मोबाइलवर व्हॉटसॲप कॉलद्वारे पत्नीशी संपर्क साधण्यास सांगितले. ‘काहीजणांनी माझे अपहरण केले असून, माझ्या जिवाला धोका आहे, दीड कोटी रुपये ठेवायला सांग. मी तुला दोन तासांनी परत फोन करतो,’ असे पतीने सांगितले. पतीच्या जिवाला धोका असल्याने पत्नीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करत दोन विशेष पथके तयार केली. दरम्यान, आरोपींनी व्यापाऱ्याच्या पत्नीला पैशांनी भरलेल्या बॅगचे छायाचित्र पाठविण्यास सांगत खंडणीची रक्कम स्वारगेट परिसरात नटराज हॉटेलजवळ गल्लीत आणण्यास बजावले. मात्र, काही वेळातच आरोपींनी ठिकाण बदलत मित्र मंडळ चौकात येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पैसे घेण्यासाठी आलेल्या प्रणव बबन निवंगुणे (वय २३, रा. आंबेगाव पठार) आणि साहिल श्रीकांत खुटवड (वय २१, रा. काशिदनगर, कात्रज) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अपहरणातील इतर साथीदारांची माहिती उघड केली. त्यानंतर पोलिसांनी खेड शिवापूर परिसरात छापा टाकून अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. यावेळी सौरव विश्वनाथ पवार (वय २७, रा. बावधन खुर्द), शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. आंबेगाव पठार) आणि मंदार श्रीधर दारवटकर (वय ३०, रा. वडगाव बुद्रूक) या तिघांनाही अटक करण्यात आली. आरोपींना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींपैकी चारजण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक आणि शैलेश संखे यांच्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने, विश्वजीत काईंगडे, युनिट तीनचे प्रशांत अन्नछत्रे, युनिट एकचे अजित जाधव, अमोल रसाळ यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.