Sharad Pawar Sarkarnama
पुणे

केंद्राच्या कररचनेवर शरद पवार नाराज; थेट मोदींवर सोडले टीकास्त्र

कर लादताना तो किती प्रमाणात लादावा, याचाही काहीतरी विचार होण्याची गरज आहे.

मिलिंद संगई

बारामती : करातून उत्पन्न मिळते, ही बाब मान्य आहे. पण, कर लादताना तो किती प्रमाणात लादावा, याचाही काहीतरी विचार होण्याची गरज आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी सध्याच्या केंद्र सरकारच्या (Central government) कररचनेवर नाराजी व्यक्त केली. (Sharad Pawar criticizes Prime Minister Narendra Modi over tax structure)

बारामती मर्चंटस असोसिएशनच्या वतीने दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी शरद पवार यांच्या भाषणाचे आयोजन केले जाते. या भाषणात व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबत नाराजी व्यक्त केल्याचा धागा पकडून शरद पवार यांनी कररचनेबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

खासदार सुप्रिया सुळे, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, पौर्णिमा तावरे, जवाहर वाघोलीकर, अमोल वाडीकर, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, किशोर सराफ, सदाशिव सातव, जय पाटील, नीलेश भिंगे, सचिन सातव, नीलेश निंबळककर, यश संघवी, तेजपाल निंबळककर आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, मनमोहनसिंग पंतप्रधान असताना जीएसटी लागू करण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी बैठक आयोजित केली गेली, त्यात जीएसटीवर सर्वाधिक हल्ला नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चढविला होता. मात्र, आज त्यांची भूमिका ही वेगळी झालेली आहे. जीएसटीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला दिसत आहे.

सोन्याच्या खरेदीवर ३८ टक्क्यांपर्यंत, तर वाहनखरेदीवर ४० टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे, या माध्यमातून रोजगारनिर्मिती तर होतेच, पण त्याबरोबर अनेक लघुद्योगही चालतात, या मुळे हा कर या सर्वांवर परिणाम करणारा ठरत आहे, अशी चिंता पवार यांनी बोलून दाखवली. व्यापार वाढवायचा असेल तर राज्य व केंद्राचे धोरण पूरक हवे. प्रोत्साहनात्मक हवे. चांगले वातावरण तयार करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज जर्मनी व अमेरिकेत काही कंपन्या संकटामुळे बंद पडलेल्या आहेत, ही संधी समजून आपण काहीतरी पावले उचलायला हवीत. भारतीय वंशाचे उद्योगपती इंग्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारु शकत असेल तर आपण भारतीय काहीही करु शकतो. या जिद्दीने काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुण्याच्या परिसरात नामांकीत चार पाच उद्योगपतींनी उद्योग सुरु केल्याने चार लाख लोकांना रोजगाराची संधी मिळाली. हिंजवडीमधील सॉफ्टवेअरमधून दोन लाख कोटींचा व्यापार होतो, या बाबी विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत.

साखर कारखान्यांनी साखरेसोबत इथेनॉल व वीजनिर्मिती सुरु केल्याने अनेक कारखान्यांनी आता जिल्हा बँकाकडून कर्जे घेणे थांबविले असून ते स्वयंपूर्ण होत आहेत, ब्राझील व थायलंडमधील संकटाचा भारतीय साखर उदयोगाला चांगला फायदा मिळणार असून त्याने बाजारपेठेतही उर्जितावस्था येईल. मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्ताविकात जीएसटीमुळे भुर्दंड वाढला, गूळाची आवक मंदावली, वारंवार कररचनेतील बदलांचा फटका बसत असल्याचे नमूद केले. अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT