पुणे : केशवराव जेधे यांनी माझ्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी काॅंग्रेसचे तिकिट दिले. तेथूनच आमच्या घराण्याच्या राजकारणाची सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. केशवरावांनी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सामान्य माणसाचे हित पाहिले. त्यांनी दिलेल्या प्रेरणेची कृतज्ञता अखेरपर्यंत मनात राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांन आपल्या भावना व्यक्त केल्या.
केशवराव जेधे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. य. दि. फडके लिखित `देशभक्त केशवराव जेधे` चरित्र पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज पुण्यात पार पडले. या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, केशवराव जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, सर्जेराव जेधे, राजलक्ष्मी जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.
केशवराव जेधे यांच्या कालखंडाचा आणि त्यांच्या विचारांचा धावता आढवा पवार यांनी आपल्या भाषणात घेतला. केशवरावांच्या या चरित्रातून महाराष्ट्राच्या 1920 ते 1954 पर्यंतचा राजकीय कालखंड समजून येतो. केशवराव जेधे यांनी सामाजिक सुधारणांसाठी पुढाकार घेतला. काॅंग्रेस ही तळागाळात पोहोचविण्यासाठी कष्ट घेतले. जेथे वैचारिक भूमिका घेणे गरजेचे होते तेथे त्यांनी ती ठामपणे घेतली. केशवराव यांचा पिंड सामान्य माणसाशी जुळणारा होता. ब्रिटिशांना या देशातून घालवले पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी करूनच ते या लढ्यात उतरले होते.
केशवराव जेधेंच्या मनात सामाजिक परिवर्तनाचा विचार रूजला होता. त्यामुळेच अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी उघड भूमिका घेतली. पुण्यातील पर्वतीा मंदिर सर्वांसाठी उघडण्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हाच्या पुणे नगरपालिकेत सत्ता असताना केशवराव यांनी मुलांसह मुलींनाही शिक्षण देणे आणि दलितांसाठी पाणवठे मोकणे करणे असे दोन ठराव मांडले. पण ते दुर्देवाने नामंजूर झाले. बार्डोलीच्या सत्याग्रहाला पाठिंब्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यात सभा घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न या निमित्ताने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली आणि त्यांना तुरुंगवासही झाला. काँग्रेसचे ग्रामीण भागात पहिल्यांदा भरलेले फैजपूर येथील अधिवेशन यशस्वी करण्यासाठी त्यांनी काकासाहेब गाडगीळ यांच्यासोबत कष्ट घेतले, असे पवार यांनी सांगितले.
पवार यांनी आपल्या कुटुंबाच्या राजकीय प्रवासाची सुरवात हे जेधेंमुळे झाल्याचे सांगितले. त्या काळात लोकल बोर्डासाठी संपूर्ण जिल्ह्यातून महिलेसाठी एकच जागा राखीव होती. त्या जागेवर आमच्या मातोश्री शारदाबाई यांनी केशवरावांनी तिकिट दिले आणि त्या लोकल बोर्डावर निवडून आल्या. केशवराव हे काॅंग्रेसचे खासदार झाल्यानंतर त्या वेळी झालेल्या सत्कार सभेला मी हजर होतो, याची आठवण पवार यांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.