Deepak Mankar - Ajit Pawar - Sharad Pawar.jpg Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Vs Ajit Pawar News : पुण्यात शरद पवारांचा मोठा धमाका; अजितदादांचा 'मोहरा' दीपक मानकर हेही फुटणार ?

Dnyanesh Savant

Pune News : पक्ष फुटल्याने लोकसभा निवडणुकीआधी शक्तिपात झालेल्या तरीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'मास्टर' खेळी करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इंगा दाखवला आणि पुरेशी ताकद नसतानाही आठ खासदार दणक्यात निवडून आणले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड बळ चढलेल्या पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या पक्षाला भगदाड पाडले असून त्यांचा पुढचे काही दिवस अजितदादांच्या गटातील बड्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न असू शकतो.

पिंपरी चिंचवडमधील तगडे नेते साहेबांनी आपल्या पक्षात आणल्यानंतर आता अजितदादांचा पुण्यातील मोहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह काही नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाकडून होऊ शकतो.

शिंदे-फडणवीसांशी घरोबा ठेवून वेगळी चूल मांडता येणार नसल्याचे हेरुन आणि आमदारकीसाठी वाट्टेल तशी ताकद लावणारे दीपक मानकर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत परतू शकतात.तसे झाल्यास म्हणजे मानकर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत गेल्यास अजितदादा आणि संबंध राष्ट्रवादीला पुण्यात मोठा हादरा बसू शकतो.मानकरांमागे डझनभर माजी नगरसेवक पुन्हा एकदा पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर नव्या किंवा जुन्याच नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी रोज दोन तास पवारसाहेब घालवत असल्याने पक्षांतराचा मोठे धमाके होण्याची चिन्हे आहेत. मानकर हे अजितदादांची साथ सोडणार का, साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे झडू लागल्या आहेत.या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर मानकर खरोखरच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत जाणार का असा सवाल त्याचदरम्यान,मानकरकांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.पण तरीही त्यांच्या पक्षप्रवेशाची सुरू झालेली चर्चा थांबलेली नाही.

काँग्रेसमध्ये वाढलेले दीपक मानकर (Deepak Mankar) हे सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी यांच्यासोबत वाद झाल्याने राष्ट्रवादीत आले.त्याआधी मानकर हे काँग्रेसमध्ये असताना उपमहापौर राहिले होते.त्यानंतर विधानसभेसाठी ते कसब्या पाठोपाठ शिवाजीनगर किंवा कोथरुड मतदारसंघावर डोळा ठेवून आहे.

दीपक मानकर यांनी बंडानंतर अजित पवारांसोबत राहिले. त्यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांच्या नेतृत्वाला आव्हान देत राहिले.बंडानंतर मानकर यांनी काही नगरसेवकांना अजितदादांकडे ओढून आणले.आणि पक्षात आपले महत्वही वाढवले. या संदर्भातील आणखी सविस्तर वृत्त 'साम' वृत्तवाहिनीवर तुम्हांला पाहता येईल.

मात्र, लोकसभा निवडणुकीत बारामतीसह राज्यभरात अजितदादांच्या नेृतृत्वातील राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आणि पवारसाहेबांचे बळ वाढले.त्यातील महायुतीतील नेते ठाकरे पवारांसह महाविकास आघाडीकडे वळले आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवडमधील काही माजी नगरसेवक शरद पवारांकडे आले आहेत.

पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातील दीपक मानकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांना आपल्याकडे घेऊन अजितदादांना धक्का देणार असल्याची चर्चा बुधवारी दुपारी 4 नंतर सुरु झाली .पवारसाहेब मोदीबागेत असून त्यांची अनेकांनी गाठीभेटी घेतल्याचे समजते. त्यात दृष्टीने मानकर आपल्या हाताशी लागतात का यासाठी शरद पवार गटाचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

दीपक मानकरांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडल्यानंतरही ते परत परतणारच अशी चर्चा आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही मानकर यांनी फिल्डिंग लावल्याची माहिती समोर येत आहे.विधानसभेच्या निवडणुकीत उतरुन शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. पण महायुतीत हा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटु शकतो का असा सवाल आहे. पण त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तर शिवाजीनगरमधून तिकिट मिळू शकते अशी अपेक्षा असावी .त्याचमुळे मानकर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

दीपक मानकर पक्षप्रवेशाच्या चर्चांवर काय म्हणाले..?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी त्यांच्या शरद पवार प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.ते म्हणाले, मी अजितदादांसोबत प्रामाणिक असून इतर कोणत्याही पक्षात जाण्यास इच्छुक नाही. राजकीय निर्णयाबाबत आम्हाला देखील विचारणा होतात.

मात्र, दादांनी मला काही दिलं नाही तरी शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहे. पुण्यामध्ये आमची पक्ष संघटना मजबूत असून पंधराशे ते सोळाशे पदाधिकारी सक्रिय काम करत आहे. यातील कोणताही पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही. याउलट 14 नगरसेवक माझ्या संपर्कात असून त्यांना दादांसोबत जोडण्याचा प्रयत्न आगामी काळात करणार असल्याचंही दीपक मानकर यांनी सांगितलं.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दीपक मानकरांच्या संदर्भातील ही टीप त्यांच्याच एका समर्थकांनी दिली आहे.त्यामुळे अजित पवार गटात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहे हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT