Shikrapur Police News Sarkarnama
पुणे

Pune Police News: स्टेशन डायरी ते चार्जशिट! पुणे जिल्ह्यातील पहिले 'एआय' साक्षर पोलीस ठाणे; तांत्रिक बाबी झाल्या सुलभ

Shikrapur AI police station: अहवाल लेखन, गुंतागुंतीच्या माहितीचे विश्लेषण, फोटो व व्हिडिओ एडिटिंग, भाषांतर आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे): दैनंदिन पोलिसींग मध्ये ’ए-आय’ची(कृत्रिम बुद्धिमत्ता)वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स कुठे आणि नेमकी कशी वापरायची आणि त्यासाठीचे ’प्रॉम्ट’ नेमके कसे द्यायचे याचे प्रशिक्षण नुकतेच शिक्रापूर पोलिस दलातील ३५ अधिकारी-कर्मचा-यांनी घेतले. हे प्रशिक्षण येथील पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या विशेष पुढाकाराने झाले. असे प्रशिक्षण घेणारे शिक्रापूर पोलिस ठाणे हे जिल्ह्यातील पहिले पोलिस ठाणे ठरले आहे.

या प्रशिक्षणामुळे दैनंदिन कामातील तब्बल ५० टक्के वेळ सध्या वाचायला सुरवात झाली असून येत्या महिनाभरात प्रशासकीय कामाचा सुमारे ९० टक्के वेळ वाचण्यापर्यंत आम्ही जावू शकतो, असा दावा पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केला आहे.

बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असताना, पोलीस दलापुढेही अनेक आव्हाने उभी आहेत. त्यातच वाढती गुन्हेगारी दर, त्याच्या तपासाची जबाबदारी, एफआयआर लिहिणे, बंदोबस्त-अटक-न्यायालयीन प्रक्रीया यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी पूर्ण व्यस्त असतो. मात्र त्याच्या मदतीला ए-आय कसे येवू शकते त्याचे एक दिवशीय प्रशिक्षण येथील ३५ अधिकारी-कर्मचारी यांनी घेतले. हे पूर्ण मोफत प्रशिक्षण येथील एएसएन कॉंप्यूटर एज्युकेशनचे प्रा.सुधीर मुळे यांनी व सानिका कराळे यांनी दिले.

या प्रशिक्षणात कार्यालयीन कामकाज अधिक जलद, अचूक आणि प्रभावी कसे करता येईल, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन पोलीस कामकाजात उपयुक्त ठरणाऱ्या ChatGPT, Google Gemini, Google Lens आणि Canva, यासारख्या विविध १७ प्रगत एआय-टूल्सची माहिती यावेळी देण्यात आली.

अहवाल लेखन, गुंतागुंतीच्या माहितीचे विश्लेषण, फोटो व व्हिडिओ एडिटिंग, भाषांतर आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सानिका कराळे यांनी सादर केले. 'डीपसीक' (DeepSeek) आणि 'क्विलबॉट' सारख्या साधनांचा वापर करून तपासातील तांत्रिक बाबी कशा सुलभ करता येतील, यावरील तांत्रिक प्रात्यक्षिकांचा या प्रशिक्षणात विशेष समावेश करण्यात आल्याने सहभागी अधिकारी-कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती प्रशिक्षक सुधीर मुळे यांनी दिली.

स्टेशन डायरीपासून ते चार्जशिटपर्यंत....

पोलिस ठाण्यात सर्वप्रथम तक्रार दाखल होणारी एफआयआर, एनसी, अर्ज वा दिवाणी तक्रारी तसेच दैनंदिन संपूर्ण पोलिस स्टेशनमधील प्रत्येक महत्वाची घडामोड नोंद करणारी स्टेशन डायरी, तपास माहिती, न्यायालयात दाखल करावयाचे चार्जशिट, आवक-जावक नोंदी, बंदोबस्त, व्हिआयपी बंदोबस्त आणि रात्रीचा बंदोबस्त अशा प्रकारच्या माहितीचे मोठे काम ए-आय मुळे अत्यंत कमी वेळेत होते. या शिवाय तपास कामात तांत्रिक विश्लेषणही ए-आयमुळे खुप सोपे होत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचा-यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT