शिक्रापूर (जि. पुणे) : मोहनलाल खाबिया, शहीदभाई पठाण आणि रसिकभाऊ धारिवाल यांची सर्वपक्षीय-धर्मनिरपेक्ष परंपरा असलेल्या शिरूरमध्ये आमदार अशोक पवारांना स्थानिक राजकारणावरून धमक्या दिल्या जात असतील तर शिरूर तालुका भारतीय जनता पक्ष पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कोणत्याही लोकप्रतिनिधींबाबत असा प्रकार भाजप सहन करणार नाही, म्हणूनच आम्ही पवारांच्या पाठीशी आहोत, असे भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी जाहीर केले. दरम्यान, हा प्रकार शिरूर नगरपालिकेच्या कारभाराशी संबंधित आहे. माजी नगराध्यक्ष आणि शिरूर शहरातील नेते उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी हा धमकीचा प्रकार नेमका स्थानिक ठेकेदारी, नगरसेवकांमधील सुंदोपसुंदी की निवडणूक जवळ आल्याने काहींचे राजकारण हे जाहीर करण्याची मागणी केली आहे. (Shirur BJP will stand behind NCP MLA Ashok Pawar: Dada Patil Farate)
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांना एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आल्याने शिरूरमध्ये सर्वपक्षीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महाआघाडीचे नेते-पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून सोमवारपासून (ता. १८ ऑक्टोबर) आंदोलन करण्यात येत आहे. भाजपनेही पक्षीय जोडे बाजूला ठेवत पवारांच्या पाठीशी राहण्याची घोषणा केली आहे.
पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी सांगितले की, शिरूर नगरपालिका कारभाराच्या अनुंषगाने आमदार अशोक पवार यांना धमकीचे पत्र आले आहे. शिरूरच्या राजकारणाला मोठी परंपरा आहे. दिवंगत माजी नगराध्यक्ष शहीदभाई पठाण, रसिकभाऊ धारिवाल व माजी उपनगराध्यक्ष मोहनलाल खाबिया यांनी सलोख्याचे, सौहार्दायाचे आणि जातीभेदापलिकडे जाऊन राजकारण करण्याचे संस्कार दिले आहेत. त्याच शहरात लोकप्रतिनिधीस धमक्या दिल्या जात असतील तर ते गंभीर आहे. तालुक्यातील कुणाही लोकप्रतिनिधीस अशा धमक्या दिल्या जात असतील भाजप संबंधित लोकप्रतिनिधीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
सत्ताधारी आमदारांना धमक्या येणे सरकारचे अपयश
सरकार तुमचे असताना एका आमदाराला अशा धमक्या येतात, हे या महाविकास आघाडी सरकारचे अपयश आम्ही समजतो. पण, अशोक पवार हे तालुक्याचे प्रथम नागरिक असल्याने त्यांना तात्काळ २४ तास पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी दादा पाटील फराटे यांनी केली. त्याबाबतचे निवेदन लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षकांसह गृहमंत्र्यांनाही तत्काळ पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना धमकी देणाऱ्यास पोलिसांनी शोधून काढावे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी शिरूरच्या भरचौकात त्याला फटकावून काढतो, असे दादा पाटील फराटे या वेळी बोलताना म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.