Shirur Gram Panchayat
Shirur Gram Panchayat sarkarnama
पुणे

Shirur Gram Panchayat : पोपटराव गावडेंना धक्का ; दामूअण्णा घोडे यांच्याकडे एकहाती सत्ता

सरकारनामा ब्युरो

शिरूर : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शिरुर तालुक्यात प्रथमच निवडणूक झाली आहे. यात माजी आमदार पोपटराव गावडे यांना धक्का बसला आहे. माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांचे पॅनल विजयी झाले आहे. (Shirur Gram Panchayat election result)

शिरूर तालुक्याचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या बेट भागातील वर्चस्वाला आज ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालाने जबर हादरा बसला. टाकळी हाजी या मुख्य गावाबरोबरच म्हसे बुद्रूक व माळवाडी या विभक्त झालेल्या ग्रामपंचायतींत गावडे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी, माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत शिवसेना, भाजप व इतर विरोधकांच्या मदतीने सत्ता स्थापन केली.

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासूनच बेट भागात व विशेषतः टाकळी हाजी मध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. माजी आमदार गावडे व माजी सरपंच घोडे हे दोघेही राष्ट्रवादीचे असल्याने, थेट माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही दोघांत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही बाजूंच्या ताठर भूमिकेमुळे अखेर निवडणूक लागली.

पोपटराव गावडे यांच्यासह त्यांचे चिरंजीव घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, सूनबाई जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, नातू टाकळीचे माजी सरपंच अजित गावडे यांनी तडाखेबंद यंत्रणा उभी केली होती. माजी सरपंच घोडे यांनी पत्नी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, भाजप किसान आघाडीचे तालुका सरचिटणीस सावित्राशेठ थोरात यांच्या मदतीने विरोधकांची मजबूत फळी उभी केली. गावडे - घोडे हे एकमेकांचे नातेवाईकच असल्याने अवघ्या बेट भागात, या निवडणूकीच्या निमित्ताने सगेसोयरेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र होते.

टाकळी हाजी ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार गावडे यांच्या नेतृत्वाखालील मळगंगा परिवर्तन पॅनेल विरूद्ध माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांच्या नेतृत्वाखालील मळगंगा ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरशीने निवडणूक झाली. एकूण १७ जागांपैकी १६ जागा मिळवून घोडे यांच्या पॅनेलने एकहाती सत्ता मिळवली. गावडे यांच्या पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

दामूअण्णा घोडे व त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे हे दोघेही ग्रामपंचायतीच्या रणांगणात थेट उमेदवार म्हणून उतरले होते. दोघांनीही एकतर्फी विजय संपादन केला. गावडे यांच्या पॅनेलमधील केवळ अरूणा दत्तात्रेय कांदळकर यांनाच निसटता विजय मिळाला. दामूअण्णा घोडे यांच्या पॅनेलच्या विजयाने बेट भागात प्रथमच पोपटराव गावडे यांच्या घराण्यासमोर प्रबळ राजकीय पर्याय उभा राहिला असून, आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत ते राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार मानले जातात.

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ पोपटराव गावडे यांचा बेट भागावर एकछत्री अंमल असून, त्यातून अनेकदा टाकळी हाजी या गावासह परिसरातील छोट्या - मोठ्या गावच्या ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध होत आल्या आहेत. टाकळी चे माजी सरपंच दामूअण्णा घोडे हे देखील त्यांच्याच तालमीत तयार झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावकीचा बहुतांश कारभार गावडे यांनी त्यांच्यावर सोपविला होता.

घोडे यांच्या पत्नी अरूणा यांना गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून पंचायत समितीची उमेदवारी मिळाली होती व तेथेही त्यांनी एकतर्फी विजय संपादन केला होता. परंतू पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी त्या तीव्र इच्छूक असतानाही पोपटराव गावडे यांच्याकडून त्यांना संधी मिळावी म्हणून फारसे प्रयत्न न झाल्याने दामूअण्णा घोडे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यापासून दूरावले. हा दूरावा इतका टोकाचा झाला की त्यांनी थेट ग्रामपंचायत निवडणूकीत स्वतंत्र पॅनेल टाकून गावडे यांना आव्हान दिले. हे बंड यशस्वी करून दाखविताना त्यांनी टाकळीसह म्हसे व माळवाडी या टाकळीतूनच विभक्त झालेल्या ग्रामपंचायतीतही वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे आजच्या निकालानंतर दामूअण्णा घोडे यांचा एकनाथ शिंदे झाला अशी चर्चा रंगली.

टाकळी हाजी ग्रामपंचायतीत विजयी झालेले उमेदवार :

वाॅर्ड क्र. १ : अशोक लक्ष्मण गावडे, पारूबाई सरजू माळी, अरूणा दामू घोडे,

वाॅर्ड क्र. २ : गोविंद सखाराम गावडे, अनिता बाळू जाधव, मनिषा विक्रम घोडे,

वाॅर्ड क्र. ३ : नानासाहेब अनंथा साबळे, विलास बबन साबळे, प्रियांका म्हातारबा बारहाते,

वाॅर्ड क्र. ४ : दामूशेठ धोंडीबा घोडे, अरूणा दत्तात्रेय कांदळकर, पुष्पाबाई शंकर थोरात,

वाॅर्ड क्र. ५ :अर्जुन मारुती खामकर, भरत रघुनाथ खामकर, प्रियांका दत्तात्रेय दिवेकर,

वाॅर्ड क्र ६ : मोहन भाऊ चोरे, प्रमिला सुभाष चोरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT