Shiv Sena's complaint regarding INS Vikrant scam, INS Vikrant scam News Updates  sarkarnama
पुणे

आयएनएस विक्रांत सोमय्यांना अडकवणार? शिवसेनेकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची तक्रार दाखल

किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : आयुर्मान संपल्याने भंगारात काढण्यात आलेली भारतीय नौदलाची विक्रांत ही युद्धनौका वाचवून तिचे संग्रहालयात रुपांतर करण्यासाठी भाजपचे (BJP) ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोट्यवधी रुपयांची लोकवर्गणी जमा केली होती. मात्र, त्यांनी ती राजभवनाला जमाच न केल्याने काल त्यांच्याविरुद्ध एका निवृत्त नौसैनिकाच्या तक्रारीवरून मुंबईत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता तो पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad) नोंद होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे (Shivsena) पिंपरीचे माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांनी त्यासाठी पोलिसांत तक्रार दिली आहे. (INS Vikrant Scam News Updates)

सोमय्यांनी विक्रांत पुनर्वसन प्रकरणात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अॅड. चाबूकस्वार यांनी केला आहे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, जमा केलेल्या पै न पै चा हिशोब त्यांच्याकडून घ्यावा, त्यांना अटक करून चौकशी करावी तसेच याकामी त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी चाबूकस्वारांनी पोलिसांकडे केली आहे. राष्ट्राची संपत्ती हडप करून त्यावर आपली पोळी भाजणाऱ्या सोमय्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत तिचे लाईफ संपल्याने भंगारात काढण्यात येणार होती. मात्र, तिचे रुपांतर संग्रहालयात करण्यासाठी दोनशे कोटी रुपये जमा करून ते राजभवनात जमा करु असे सोमय्यांनी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी 'सेव्ह विक्रांत'ही मोहीम राबवली. २०१३ -२०१४ ला त्यांनी मुंबईत विविध रेल्वे स्थानकांबाहेर उभे राहून सर्वसामान्य नागरिक, नेव्ही ऑफिसर, कर्मचारी यांच्याकडून लोकवर्गणीच्या माध्यमातून शेकडो कोटी जमा केले.

मात्र, राज्यपाल कार्यालयात ते दिलेच नाही, असा धक्कादायक खुलासा माहिती अधिकारात नंतर उघड झाला. हे पैसे सोमय्यांनी त्यांच्या मुलाच्या कंपनीत व निवडणुकीसाठी वापरले, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल केला. त्यावर आलेल्या तक्रारीवरून काल मुंबईत सोमय्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सोमय्यांविरुद्ध औरंगाबादलाही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तो पिंपरीतही दाखल करावा, म्हणून आज शिवसेनेने पोलिसांत धाव घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT