Adv. Ulhas Bapat
Adv. Ulhas Bapat Sarkarnama
पुणे

'बंडखोर १६ आमदार अपात्र ठरू शकतात; पण...'

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (जि. पुणे) : शिवसेनेकडून (Shivsena) ज्या बंडखोर १६ आमदारांना (MLA) अपात्र ठरवावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ती कदाचित कायद्याच्या आधारे मान्य होऊ शकते. पण, त्यासाठी विधानसभेचे सभापती व राज्यपाल यांचे वर्तन निःपक्षपणाचे असणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ, राज्यघटनेचे अभ्यासक ॲड. प्रा. उल्हास बापट (Adv Ulhas Bapat) यांनी स्पष्ट केले. (Shiv Sena rebel 16 MLAs may be disqualified; But... : Adv. Ulhas Bapat)

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २४ व्या आचार्य अत्रे मराठी संमेलनात `प्रचलित न्यायव्यवस्था` या विषयावर बापट यांची प्रगट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदाराबाबतची शक्यता वर्तवली. ते म्हणाले की, पक्ष फुटीसाठी दोन-तृतीयांश (२/३) सदस्य संख्या आवश्यक असते. मात्र, त्यासाठी फुटीर गटाने अन्य पक्षात विलीन व्हावेच लागते. ज्या आमदारांना अपात्र ठरवा; म्हणून मागणी होते आहे. ती कायद्याच्या आधारे कदाचित मान्य होऊ शकते. त्याबाबत सभागृहाचे सभापती व राज्यपाल यांचे वर्तन निःपक्षपणाचे असावे लागते.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांच्या कारकिर्दीत काही वेळा घटनेचे उल्लंघन केले आहे, असे मला वाटते. सद्याच्या राजकीय परिस्थितीत काही केंद्रीय संस्था या केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करतात, असेही दिसून येत आहे. पण, भारतातील लोकशाही आदर्श असल्याने योग्य वेळी लोकशाही जपण्यासाठीचा प्रयत्न जनता करते. लोकशाही व्यवस्था हा भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा आहे. अलीकडच्या राजकीय घडामोडी मात्र सदृढ लोकशाही वाढीसाठी तितक्याशा पूरक नाहीत अशी खंतही प्रा. बापट यांनी व्यक्त केली.

बापट म्हणाले की, अमेरिकेत घटना दुरुस्ती करायची म्हटले तरी किमान दोन वर्षे लागतात. भारतात मात्र इंदिरा गांधी यांनी अल्पावधीत म्हणजे चार दिवसांत घटना दुरुस्ती करुन दाखविली. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यापुढे जाऊन दोन दिवसांत घटना दुरुस्त करुन रेकाॅर्ड मोडले. तरीही भारतातील लोकशाही अत्यंत आदर्श असल्याने जनता म्हणजे मतदार योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि यापुढेही करतील.

ॲड. दिलीप निरगुडे यांनी मुलाखत घेतली. महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश खाडे व्यासपीठावर उपस्थित होते. सासवड बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय भोईटे हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे, स्वागताध्यक्ष वसंत ताकवले, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT