Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
पुणे

शिवसेनेचा अखेर स्वबळाचा नारा; आदित्य ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर!

गणेश कोरे

पुणे : शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर पुणे (Pune) जिल्ह्यातील माजी मंत्री आणि शिवसेनेचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे, उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार शरद सोनवणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात डेरेदाखल झाले आहेत. पण, हार न मानता शिवसेना पक्षनेतृत्वाने संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir), पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी पुणे जिल्हा पिंजून काढत स्वबळावरचा नारा देत गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा लवकरच पुणे जिल्‍ह्यात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Shiv Sena will contest the upcoming elections on its own)

सचिन अहिर आणि रवींद्र मिर्लेकर हे गेल्या तीन दिवसांपासून तालुकानिहाय मेळावे घेत पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक तालुक्यात प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतची आघाडी तोडण्याची आक्रमक मागणी करत असल्याने नेत्यांनी देखील त्यादिशेने जाण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच जुन्नर तालुक्याच्या मेळाव्यात सचिन अहिर यांनी जुन्नर विधानसभेचा उमेदवार शिवसेनेचाच असेल असे जाहिर करत जिल्हा भगवामय करण्याची सुरुवात जुन्नरपासून झाल्याचे जाहीर केले आहे. अहिर यांच्यासह मिर्लेकर यांनी जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांचे दौरे केले आहेत. या प्रत्येक दौऱ्यात त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, त्यामुळे शिवसेनेतील गळती रोखण्यास यश आल्याचे बोलले जात आहे.

सासवड येथे शुक्रवारी (ता. २२ जुलै) पुरंदर तालुक्याचा मेळावा झाला. या मेळाव्यात सासवड, जेजुरी नगरपालिका व पुरंदर-हवेलीतील महापालिका, जिल्हा परीषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्वबळावर व धनुष्यबाणासह लढेल. उद्धव ठाकरे सारख्या प्रामाणिक माणसाला सत्तेवरुन खाली खेचल्याचा राग शिवसैनिकांमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यातून कट व गट करून राहिलेल्यांना एकवटलेले शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिला.

जलयुक्तमधील खेकडे शोधू : नीलम गोऱ्हे

पुरंदरमधील तत्कालीन लोकप्रतिनिधी व जलसंधारण-जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला होता. त्याविषयावर विधान परिषद उपसभापती म्हणून आपण या स्थितीत काही हालचाल करणार का, या प्रश्नी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, त्यावेळी काही बंधारे फुटले होते. खुलासा आला की, खेकड्यांनी बंधारे फोडले. आता मग वेळ आली तर व वरिष्ठांनी लक्ष घातले तर जलयुक्तमधील खेकडे पुन्हा शोधू.

जुन्नरचे माजी आमदार दांगट स्वगृही

प्रबोधनकार ठाकरे आणि सावळारामबुवा दांगट यांच्यापासून चार पिढ्यांचा कौटुंबीक स्नेह असलेल्या दांगट कुटुंबातील बाळासाहेब दांगट हे जुन्नरमधून सलग दोन वेळा आमदार होते. मात्र, तिसऱ्या वेळी पराभवानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांशी झालेल्या वादानंतर दांगट शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले होते. त्यानंतर १५ वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिलेले बाळासाहेब दांगट यांनी त्यांचे बंधू आणि उद्योजक बाजीराव दांगट यांच्या समवेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी शुक्रवारी (ता. २२) भेट घेतली. या भेटीनंतर दांगट शिवसेनेत सक्रीय होणार असल्याचे संकेत दिल्याने जुन्नर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. हे शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडले आहे.

आदित्य ठाकरे लवकरच पुण्यात

पुणे जिल्ह्यातील आपला भगवा आपली शिवसेना अभियानानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा पुणे जिल्ह्यात होणार आहे, अशी माहिती संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिली. या यात्रेदरम्यान विधानसभा मतदारसंघानिहाय आढावा आणि मेळावे होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT