Shrirang Barne sarkarnama
पुणे

Shive sena Vs Bjp : मावळच्या जागेवर शिवसेना की भाजप लढणार, उत्तर मिळालं...

Roshan More

Pimpri Chinchwad : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघाची चर्चा देशभर झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला. मात्र, आता सत्तासमीकरणे बदलली आहेत. अजित पवार महायुतीसोबत सत्तेत आहेत, तर शिवसेनेत फूट पडल्याने या मतदारसंघातील शिवसेनेची ताकद घटली असल्याचा दावा भाजप पदाधिकारीच करत आहेत. त्यामुळे भाजपच्या माजी आमदाराकडून येथून लढण्याची तयारी केली जात असल्याचे चर्चा आहे. मात्र, शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हाप्रमुख यांनी येथून कोण लढणार, याचे उत्तर देऊन टाकले आहे.

'श्रीरंग अप्पा बारणेंच्या कामावर शिवसेनेसह भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी खूष आहेत. अप्पा शिंदेसाहेबांसोबत आले तेव्हाच ही जागा शिवसेनेला, अप्पांना देण्याचे वरिष्ठ पातळीवर निश्चित झाले होते. आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येक जण दावा करू शकतो, त्यात गैर काहीच नाही. मात्र, भाजप-शिवसेनेचे आधीच ठरले आहे. ही जागा शिवसेनेचीच,' असे शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत राष्ट्रवादीचा समावेश झाला आहे. त्यामुळे साडेतीन ते चार लाखांच्या फरकाने श्रीरंग अप्पा बारणे निवडून येतील, असा विश्वास वाल्हेकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळी सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिक पदाधिकारी हे ठाकरेंसोबत असल्याचे चित्र होते. मात्र,आता हे चित्र पूर्ण बदलले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मोठ्या संख्येने शहरातील पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले. मागील सहा महिन्यांतदेखील शहरातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांकडून लढण्यासाठी आग्रह

माजी आमदार बाळा भेगडे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी मोठे शक्तिप्रदर्शन केले. वाढदिवसादिवशी त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांनी आगामी खासदार म्हणून भेगडे यांचा उल्लेख केला. तसेच भावी खासदार म्हणून बॅनरदेखील लावले होते. युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे येथून विद्यमान खासदार आहेत. मात्र, लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात फक्त शिंदे गटाचा एकच आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेची इथे ताकद नसल्याचा दावा भाजप पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळेच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून भाजपनेत्यांकडे हा जागा लढवण्यासाठी आग्रह केला जात आहे.

मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये येणार

शिवसंकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पिंपरी-चिंचवडमधील किवळे येथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसंकल्प अभियानातून शिवसेना (शिंदे गट) लोकसभेची तयारी करीत आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेऊन मावळमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी कितीही दावा करो, त्यांना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचेच काम करावे लागणार, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT