Crime
Crime Sarkarnama
पुणे

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित पुणे ग्रामीण पोलिसांच्या तावडीत

सरकारनामा ब्यूरो

मंचर : एकलहरे-फकीरवाडी (ता.आंबेगाव) येथे ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून खून करून संतोष सुनील जाधव (वय २४, रा.पोखरी, ता.आंबेगाव) साथीदारांसह फरार झाला होता. त्यावेळी जाधवला आश्रय देणारा सिद्धेश उर्फ सौरभ उर्फ महाकाल हिरामण कांबळे (वय १९ रा.नारायणगाव ता.जुन्नर) याला मोका अंतर्गत पुणे- नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरून पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीला पुण्यातील मोका न्यायालयाने २० जूनपर्यंत पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.दरम्यान, मुसेवाला हत्या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली व पंचाब पोलिसांचे पथक आज मंचरला पोचले. बाणखेले हत्या प्रकरणातील संशयित आरोपी महाकाल हिरामन कांबळे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी पंजाब व दिल्ली पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे समजते.

पंजाबमधील प्रसिद्ध गायक व कॉंग्रेसचे युवा नेते सिदधू मुसेवाला यांची पंजाबमधील मन्सा जिल्ह्यात जवाहरके गावात रविवारी (ता.२९) मे संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील संशयित म्हणून जाधव व कांबळे या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. पुणे ग्रामीण पोलीस या दोन आरोपींच्या मागावर गेली अनेक महिने होते. मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब व नवी दिल्लीचे पोलीस चौकशीसाठी पुणे व मंचर येथे आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील संशयित आरोपीचे कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात असल्याचे उघड झाल्याने पोलीस यंत्रणेसह परिसरात खळबळ उडाली आहे. बाणखेले हत्येतील जाधव व कांबळे यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण शाखेचे अशोक शेळके, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्यासह तीन पथके कार्यरत होती.

गोपनीय बातमीदारकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन काळे, गणेश जगदाळे, पोलीस नाईक दीपक साबळे, राजू मोमीन, सचिन घाडगे आदी पथकाने आरोपी कांबळेला अटक केली आहे. तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे, बालाजी कांबळे, आर.डी मोहिते, सोमनाथ वाफगावकर मदत करत आहेत.

सिद्धेश उर्फ सौरभ उर्फ महाकाल हिरामण कांबळे कडून होणाऱ्या चौकशीतून ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणी पोलीस यंत्रणा दुसरा आरोपी संतोष सुनील जाधव पर्यंत पोहचू शकते. त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करत आहे, असे राजगुरुनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT