Someshwar Sugar Factory election
Someshwar Sugar Factory election Sarkarnama
पुणे

अजितदादांची विक्रमी कामगिरी : ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादीचे सहा जण १६ हजारांच्या फरकाने विजयी

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर विकास पॅनेल राज्यातील आजवरच्या सर्वात अभूतपूर्व विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. पवार यांनी सलग सातव्यांदा कारखान्यावर आपले एकहाती वर्चस्व राखले आहे. दुपारी चारपर्यंत मोजलेल्या मतमोजणी दोन गटांत तब्बल १५ ते १६ हजार मतांच्या फरकाने राष्ट्रवादीप्रणित पॅनेलच्या उमेदवार विजयी झाले आहेत. हाच ट्रेंड यापुढेही कायम राखून राष्ट्रवादीची ऐतिहासिक विजयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. (Six NCP members won by 16,000 votes in Someshwar Sugar Factory)

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ तारखेला २५६७७ पैकी २०५३३ म्हणजे ८० टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत निंबुत-खंडाळा या गटाचा पहिला निकाल आज पावणेदोन वाजता प्रशासनाने अधिकृतरित्या जाहिर केला. यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर विकास पॅनेलचे अभिजित सतीशराव काकडे, लक्ष्मण गंगाराम गोफणे, जितेंद्र नारायण निगडे निवडून आले आहेत. त्यांनी पुणे बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे बाबुराव गडदरे, शंकर दडस, श्रीरंग साळुंखे व अपक्ष सोमनाथ मदने यांचा पंधरा ते सोळा हजारांच्या फरकाने पराभव केला. पावणेचार वाजता झालेल्या मुरूम वाल्हे गटाच्या निकालात विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, युवा नेते ऋषी गायकवाड यांनी विक्रमी बाजी मारली आहे. त्यांनी परिवर्तन पॅनेलचे माजी संचालक पी. के. जगताप, संपत भोसले, हनुमंत शेंडकर यांचा दारुण पराभव केला.

पवार यांचे नेहमीचे विरोधक व शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी यावेळी पवारांसोबत युती केली होती. तसेच काँग्रेसचेही बळ मिळाले. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील बारामती, खंडाळा, फलटण, पुरंदर या चारही तालुक्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचेच आमदार होते. याशिवाय सोमेश्वर कारखान्याने मागील पाच वर्षांत राज्यातील उच्चांकी भाव दिले होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले झाल्याने सभासदही समाधानी होते. कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम व शिक्षणसंस्थेचे कामही जोमात चालले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याकडे दुर्लक्ष केल्याचा अजित पवार यांना फटका बसला होता आणि निवडणुक अटीतटीची झाली होती. यावेळी पवार यांनी कारभारावर नियंत्रण ठेवले व पुरूषोत्तम जगताप यांच्या संचालक मंडळाकडून कारखाना कर्जमुक्त करून घेऊन राज्यात नामांकित बनविला होता. या सगळ्याची पावती म्हणून सभासदांनी पवारांच्या पारड्यात भरभरून दान टाकले. उमेदवारीत झालेली नाराजीही काढण्यात पवारांच्या धारदार बोलण्यामुळे यश मिळाले होते.

दुसरीकडे भाजपप्रणित सोमेश्वर परिवर्तन पॅनेल हा अत्यंत सामान्य शेतकऱ्यांचा पॅनेल होता. शेतकरी कृती समितीची साथ तुटल्याने दिलीप खैरे व माजी संचालक पी. के. जगताप यांच्यावरच सगळा भार पडला होता. ऐनवेळी पॅनेल टाकल्याने आणि पॅनेलला आधीच्या कामाची पार्श्वभूमी नसल्याने सभासदांनी संपूर्ण पॅनेल मोठ्या फरकाने नाकारला. प्रचारालाही फक्त पाचच दिवस मिळाल्याने आणि राष्ट्रवादी व शेतकरी कृती समितीतील नाराजीवर भिस्त ठेवल्याचाही परिवर्तन पॅनेलला फटका बसला. दरम्यान भाजपकडून अजित पवारांविरोधातील खासगीकरणाच्या आरोपांनाही यानिमित्ताने सभासदांनी मूठमाती देत त्यांच्यावरचा विश्वास प्रकट केला आहे. या निकालाने भाजपच्या गोटात शांतता पसरली होती, तर राष्ट्रवादीच्या गोटात अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी सभासदांनी निवडून दिल्याचा आनंद व्यक्त होत होता.

आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिला निकाल हाती येण्यास तब्बल पावणेदोन वाजले. या निकालाने राष्ट्रवादी अत्यंत एकतर्फी निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री नऊ ते दहापर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी शक्यता आहे. मते बाद होण्याचीही संख्या जास्त आहे. सद्यस्थितीत भाजपच्या सर्वच उमेदवारांना दोन हजारांच्या आसपास मते पडतील, अशी शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सतरा हजारांच्या पुढेच चालतील. त्यामुळे हा विजय पंधरा ते सोळा हजारांच्या मतांचा ठरणार आहे. आजवरचा हा राज्याच्या साखर कारखानदारीत सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

सोमेश्वरमधील राष्ट्रवादीप्रणित सोमेश्वर विकास पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : निंबूत-खंडाळा गट क्र. 1 ः अभिजित सतीशराव काकडे (17 हजार 732), लक्ष्मण गंगाराम गोफणे (17 हजार 273), जितेंद्र नारायण निगडे (17 हजार 135). मुरूम-वाल्हे गट क्र. 2 ः पुरुषोतम रामराजे जगताप (17 हजार 625), ऋषीकेश शिवाजी गायकवाड (17 हजार 624), राजवर्धन शिवाजीराव शिंदे (17 हजार 235).

भाजप प्रणित सोमेश्वर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवरांना मिळालेली मते : निंबूत-खंडाळा गट क्र. 1 ः बाबुराव दशरथ गडदरे (२१७४), शंकर पोपट दडस (१७६२), श्रीरंग गुलाब साळुंखे (१६३४), अपक्ष सोमनाथ कृष्णा मदने (७७८). मुरूम-वाल्हे गट क्र. 2 ः प्रकाश किसन जगताप (2222), संपत भोसले (1751), हनुमंत पांडुरंग शेंडकर (1574), अपक्ष- ज्योतिराम जाधव (601).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT