Sunil Shelke News Sarkarnama
पुणे

Maval News : ...तर ११ तारखेपासून तळेगाव एमआयडीसी बंद करू, आमदार शेळकेंचा निर्वाणीचा इशारा

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : तळेगाव (ता. मावळ) एमआयडीसीतील जनरल मोटर्स ही कंपनी दोन वर्षांपूर्वी व्यवस्थापनाने बंद केल्याने एक हजार कामगार बेरोजगार झाले. नंतर ही कंपनी ह्युंदाई मोटर्सला विकण्यात आली. पण त्यांनी जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही. त्यामुळे गांधी जयंतीला त्यांनी कुटुंबासह जुन्या पुणे (Pune) -मुंबई महामार्गालगत एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणारे स्थानिक आमदार मावळचे सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी सोमवारी आंदोलनस्थळी भेट दिली.

या वेळी येत्या आठ दिवसांत १० तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर ११ तारखेला तळेगाव एमआयडीसी (MIDC) बंद करू, भले; मग काही कंपन्या गेल्या, तरी चालतील, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी आपल्याच सरकारला दिला. भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याने याप्रश्नी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन शेळकेंनी या वेळी केले. मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक बैठका होऊनही जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न मार्गी न लागल्याने किती आणि काेणाकाेणाकडे मीटिंगा लावायच्या, अशी संतप्त विचारणा त्यांनी केली.

दोन्ही कंपन्यांनी मिळून कामगारांचा हा प्रश्न मिटवला नाही, तर कंपनी चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला कंपनी आणि राज्य सरकार जबाबदार असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कारण दुसऱ्याही कंपन्या कामगारांना अशाप्रकारे देशोधडीला लावतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आम्ही (लोकप्रतिनिधी) कमी पडल्याने तुम्हाला (कामगार) रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

कामगारांच्या संघर्षात मी बरोबर होतो, उद्याही आणि कायम असेल, असे शेळकेंनी आंदोलक कामगारांना आश्वस्त केले. त्यांनी कामगारांना एक राहण्याचे आवाहन केले. तसेच महिला आणि मुलांना घरी जाण्यास सांगितले. खाऊन यांचा कार्यक्रम करू, त्यांना जागा दाखवू, असे ते म्हणाले. राज्य सरकार याप्रश्नी गंभीर नसल्याचे सांगत त्यांनी ठरवले आणि मनावर घेतले, तर एका तासात हा प्रश्न सुटणार आहे, असे ते म्हणाले. जनता हीच माझी सत्ता आणि सरकार आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT