Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती. त्यानंतर आज (२ जुलै) खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीतील घडामोडींमुळे पुन्हा भाकरी फिरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील हेदेखील राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्यास जयंत पाटील यांची नाराजी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती. त्याला बरेच दिवस उलटून गेले. त्यानंतर आजच्या आमदारांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे. आमदार हसन मुश्रीफ अमोल कोल्हे, किरण लम्हाटे, धनंजय मुंडे, खासदार दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, गेल्या पाच वर्षापासून जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली. पण अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी न दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
अजित पवार यांच्या मागणीनंतर ज्येष्ठ आमदार छगन भूजबळ (Chagan Bhujbal) यांनी प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी नेत्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते पद आणि अजित पवार यांना प्रदेशध्यक्षपद दिलं तरी पक्षातील सर्व महत्वाची पदं ही मराठा नेत्यांच्या हाती जातील. यामुळे जातीय समतोल साधला जाणार नाही, या कडे लक्ष वेधत ओबीसी नेत्यालाच प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी केली, असं राजकीय तज्ञांची मत आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.