ज्ञानेश्वर भंडारे
NCP News : पिंपरी चिंचवड महापालिकेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधांची माहिती दिली. बैठकीत अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण निर्मूलन, आरोग्य सुविधा आणि प्रदूषण नियंत्रणाच्या विषयांवरही चर्चा केली.
प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. महापालिकेतील आढावा बैठकीच्या निमित्ताने नगरसेवकांनी निधीचा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांचाही प्रशासनाने विचार करावा, असे त्यांनी महापालिका आयुक्त डॉ सुर्यवंशी यांना सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या महापालिका भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपच्या नगरसेवकांचाच गराडा अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवार यांच्या भोवती भाजपच्या नगरसेवकांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे या भेटीत राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजप नगरसेवकांचा वावरच अधिक ठळकपणे जाणवला.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शहराकडे स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहराचे नियोजन करताना या लोकसंख्येचाही विचार करा. पिंपरी-चिंचवडचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे लागणार आहे. पाणीपुरवठा आणि वाहतुकीशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्यास प्रशासनाला सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.
शहरातील दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत पवार म्हणाल्या, ‘‘पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. टाटा धरणातून एक टीएमसी पाणी आणण्याची व्यवस्था झाली, तर शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. भामा-आसखेडचेही पाणी शहरात लवकरच येणार आहे.’’
अजित पवार यांच्या शहराशी असलेल्या नात्याचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘‘दादा आणि पिंपरी-चिंचवड शहराचे जिव्हाळ्याचे नाते होते. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीही अजित पवार यांचा शहराचे शिल्पकार असा उल्लेख केला होता. हे शहर औद्योगिक प्रगतीचे केंद्र व्हावे, असे दादांचे स्वप्न होते. देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनविण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. या शहरासाठी मीही कष्ट घेईन.’’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.