Baramati Political News : ज्येष्ठ नेते शरद पवारांपासून वेगळे होत उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाले. या घटनेला आता सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी गेले असले तरी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राजकीय घडामोडींवर एकही शब्द उच्चारला नव्हता. आता बारामती लोकसभेतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यासाठी त्यांनी प्रचाराची मोहीम सुरू केली आहे. यातील एका सभेत त्यांनी मूळ राष्ट्रवादी पक्षफुटीवर प्रकाश टाकत अजित पवारांची बाजू लावून धरली.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून प्रचाराची राळ उठवल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापुरातील एका सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांनी बारामतीसह परिसरातील तालुक्यांचा केलेल्या विकासाकडे लक्ष वेधले. हा विकास कोणी केला, कसा केला, हे सर्वांना माहीत असल्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादी फुटीवर भाष्य केले.
राष्ट्रवादी पक्षात असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) अनेकांशी पंगा घेतला. तो कुणासाठी? त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच त्यांना अनेकांचा विरोध होत आहे. पक्षवाढीसाठीच त्यांनी अनेकांशी वाईटपणा घेतला. पक्षासाठी सर्व काही केल्यानंतरही त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला असेल, त्यामागे काहीतरी कारण असेलच ना, असे म्हणत सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) अजितदादांचा निर्णय योग्य असल्याचे सूचित केले.
अजित पवारांनी केलेल्या कामांमुळेच बारामतीसह (Baramati) परिसराचा विकास झाला. त्यामुळे तुम्ही दादांच्या पाठीशी आहे, पुढेही राहाल हा विश्वास आहे. निवडणुकीत निवडून येणे किंवा न येणे हा विषय वेगळा आहे. शेवटी दादांनी जे काम केले आहे, तो विकास समोर ठेवूनच जनता दादांसोबत आहे. दादा पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत पक्षातील ८० टक्के लोक आले आहेत. त्यामुळे दादांनी पक्ष चोरला असे कुणीही म्हणू शकत नाही, असेही सुनेत्रा पवारांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.