Supriya Sule  Sarkarnama
पुणे

Supriya Sule यांना CM करण्याच्या हालचाली, या चंद्रकांतदादांच्या दाव्यावर त्या म्हणाल्या...

सलग सात वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांची `सरकारनामा`ला खास मुलाखत

योगेश कुटे

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने त्यावर साहजिकच चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीला अडीच वर्षे पूर्ण होताच हा बदल होणार असल्याचा दावा पाटील करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी चंद्रकांतदादांच्या विधानाला फारसे महत्व न देण्याची भूमिका घेतली. `सरकारनामा`शी बोलताना त्या म्हणाल्या, ``आमचे सरकार हे लोकशाही मानणारे असल्याने ते काहीही बोलू शकतात. त्यांच्या बोलण्याला कोणी अटकाव करू शकत नाही. त्यांना बोलण्याचा आनंद घेऊ द्या.``

सुळे यांना लोकसभेतील कामगिरीबद्दल सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त `सरकारनामा`ला त्यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

-तुम्ही मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा चंद्रकांतदादा करत असतात. त्यात कितपत तथ्य आहे?

-ते रोज काही ना काही बोलतात. त्यावर मी काय बोलणार? आमचे सरकार दडपशाही करणारे नसल्याने त्यांच्या बोलण्याला अटकावही करणार नाही.

-तुम्ही त्यांच्या बोलण्याला फार महत्व देत नाही?

-मी असे म्हटलेले नाही

-तुम्ही इतके वर्षे संसदेत काम केलेले आहे. राज्याच्या विधानसभेत काम करण्याची इच्छा नाही का?

-येथे माझ्या मनाचा प्रश्न येतोच कुठे? याबाबत पक्ष निर्णय घेणार आहे आणि मी पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागणार आहे. त्यामुळे याबाबत माझे मत स्पष्ट आहे.

-महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात केंद्रीय यंत्रणा कारवाया करत आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठीच हे होत आहे का?

-आम्हाला अडचणीत आणण्यासाठीच या कारवाया आहेत. पण याचा अंतिम परिणाम काय होणार आहे? एवढी यंत्रणा त्यासाठी राबविली जाते. न्यायालयातही अनेक आरोप टिकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अडीच वर्षे हे सरकार पाडण्यासाठीचे प्रयोग सुरू आहेत. पुढील अडीच वर्षेही ते सुरू राहतील. सूडबुद्धीने ही कारवाई सुरू आहे. ईडीची चौकशी होणार हे भाजप नेत्यांनाच आधी कसे कळते. तो पेपर कसा काय फुटतो? हे सारे जनतेला कळते आहे. आमचा भाजपशी वैचारिक लढा आहे. तो आम्हाला लढावा लागेल. दडपशाहीविरोधात आवाज उठवावा लागेल.

-सलग सात वेळा तुम्हाला संसदरत्न पुरस्कार मिळाला. विरोधी पक्षाच्या खासदार झाल्यानंतर कामगिरी उठावदार झाली का?

- लोकसभेमध्ये 2009 मध्ये मी पहिल्यांदाच निवडून गेले होते. तेव्हा युपीए सरकार सत्तेत होते. नवीन खासदार असल्यामुळे सर्व यंत्रणा समजून घेण्यात, माहिती घेण्यास काही कालावधी गेला. अभ्यास करून लोकसभेत बोलले. त्याचा चांगला परिणाम झाला असावा.

-संसदेत प्रभावी काम करणारे आणखी कोणते खासदार आहेत?

-खरे तर प्रत्येक खासदार हा 20 ते 25 लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तो अभ्यास करून, कष्ट करूनच येथे पोहोचलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाचे काम चांगले असते. माझ्यापेक्षा अनेक हुशार लोक तिथ आहेत. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी वेळ देते. त्यातून अनेक विषय समजतात.

-मोदी सरकार संसदेचे महत्व कमी करत आहे, असा विरोधकांचा नेहमीच आरोप असतो. त्याबद्दल काय सांगाल?

-मोदी सरकारबद्दल हा अनेकदा आला आहे. संसदेत एक माहिती दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाला वेगळेच कळवले जाते. त्यामुळे अनेकदा संसदेला सरकार विश्वासात घेत नसल्याचे वाटते.

-कोणते मंत्री खासदारांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देतात, असे वाटते?

-पहिले नाव अर्थातच नितीन गडकरी. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे देखील चांगली उत्तर देतात. त्यांच्याकडून नवीन माहिती मिळते.

-महिला खासदार या फक्त महिलांच्या प्रश्नांनाच प्राधान्य देतात का?

-परराष्ट्र धोरण असो की संरक्षणाचा विषय यावरही मी बोलले आहे. त्यासंबंधीच्या संसदीय समितीवर मी काम केले आहे. महिलांच्या प्रश्नांवर मी बोलणे स्वाभाविकच आहे. पण कोणताही विषय असला ती अभ्यास करूनच त्यावर बोलावे, असा माझा कटाक्ष असतो.

-भाजपशी तुमचा राजकीय सामना पुणे महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येईल?

-पुण्यात भाजपची कामगिरी अतिशय खराब आहे. त्यांनी पुण्यात पाच वर्षांत काय केले? महापालिकेच्या या निवडणुकीसाठी ते पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच बोलावणार आहेत. त्यांना सांगण्यासारखी काही कामे नाहीत. त्यामुळेच त्यांना मोदींना बोलवावे लागत आहे. येथेच त्यांच्या पराभवाची चाहूल दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT