Congress and BJP flag Sarkarnama
पुणे

Kasaba By-Election : भाजपकडून अजूनही सर्व्हे सुरूच, काँग्रेस नेते काश्मीरमध्ये

BJP vs Congress : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोमात तयारी; काँग्रेस सध्यातरी निवांत

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Kasaba By-Election News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची नावे प्रदेशाकडे पाठविलेली आहेत. असे असले तरी भाजपकडून स्थानिक नागरिकांचा कोणाला, कसा कल आहे, याबाबत सर्वेक्षणातून चाचपणी करीत आहे. भाजपच्या हा अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल उमेदवार निश्‍चितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

एकीकडी भाजप (BJP) पोटनिवडणुकीची जोमात तयारी करीत असताना दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते जम्मू काश्मीरला गेले आहेत. श्रीनगर येथे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा सोमवारी (ता. ३०) समारोप आहे. त्या कार्यक्रमासाठी येथील सर्वच नेते तिकडे गेले आहेत. त्यामुळे कसब्याच्या उमेदवारीचा विषय बाजूला पडला आहे. मात्र येत्या आठवड्यात दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी घडामोडींना वेग येणार आहे.

आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्याने कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या पाच निवडणुकांपासून कसब्यातून सतत भाजपचाच उमेदवार निवडून आला आहे. मात्र यावेळी काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपने शहराबाहेरील तीन संस्थांकडून उमेदवार कोण असावा, यासाठी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. पुढील दोन दिवसात त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवला जाईल. त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसमधून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे, संगीत तिवारी आदी इच्छुक आहेत. सध्या काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. शहरातील प्रमुख नेते व प्रदेशावरील नेते भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी जम्मू काश्मीरला गेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस यावर कोणतीही चर्चा होणार नाही.

तसेच कसब्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही, यावर आधी निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या आठवड्यात बैठक होऊन त्याचा निर्णय होईल. आघाडी झाली नाही तर कसब्यातील गणित मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.

चहातून कोणी 'गेम' केला?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) कोथरूड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी कसब्यातील इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आले होते. कार्यक्रम संपण्यास वेळ असल्याने त्यांना सभागृहाच्या प्रतिक्षा कक्षात चहासाठी काही जणांनी बोलविले.

फडणवीस आत असल्याने सर्वजण कक्षात गेले, मात्र तेवढ्यात फडणवीस कार्यक्रम संपण्यापूर्वीच बाहेर पडले. त्यामुळे फडणवीस यांची इच्छुक व पदाधिकाऱ्यांना भेट घेता आली नाही. यानंतर मात्र, या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऐन मोक्याच्या क्षणी आपल्यावर चहाची गेम कोणी केला, याचा शोध सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT