भोंदू स्वप्नील लांडेंविरोधात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा आरोप
POCSO कलम ८ अन्वये कारवाई; आरोपी फरार
तळेगाव दाभाडे (पुणे): दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून घरी देवीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या पुण्यातील बिबवेवाडी येथील स्वप्नील बजरंग लांडे याच्याविरुद्ध मावळातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. स्वप्नील बजरंग लांडे (रा. बिबवेवाडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरी देवीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी ९ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पीडित मुलीचा जबाब नोंदविल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७५ आणि पोक्सो कायद्यातील कलम ८ प्रमाणे कलमवाढ करण्यात आली. गुन्हा क्रमांक २०९/२०२६ असा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला पुण्यातील बिबवेवाडी येथे बोलावून घेऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अद्याप अटक झालेला नसून फरार आहे.
लोणावळा विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन राऊळ तपास करीत आहेत.
दरम्यान, दैवी शक्तीच्या नावाखाली श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. या प्रकरणातील आरोप तपासाच्या अधीन असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्याबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.