Deenanath Hospital : गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर कडक करावाई करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच आता या मृत्यू प्रकरणाचा ससून रुग्णालयाचा बहुप्रतिक्षित चौथा अहवाल समोर आला असून यात दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. त्यामुळे आता या दीनानाथ रुग्णालयावर कारवाई होणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे.
याबाबत बोलताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर कोणालाही क्लिनचीट देण्यात आलेली नाही. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अनियमितता होत असेल तर कारवाई केली जाणारच आहे. मंगेशकर ट्रस्टकडून, ससूनकडून आणि राज्य शासनाकडून आलेल्या अहवालांचा एकत्रित अभ्यास करून राज्य शासन दोषींवर कारवाई करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे आता सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आबिटकर हेच घेणार असल्याचे स्पष्ट होते.
गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे या गर्भवतीचा 2 जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी भिसे यांना रक्तस्त्राव होत असल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही. त्यावेळी दीनानाथचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी नातेवाइकांकडे 10 लाख रुपयांची अनामत रकमेची लेखी मागणी केली. मात्र, नातेवाइकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. पण घैसास यांनी तनिषा यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे भिसे कुटुंबीय तेथून बाहेर पडले.
दीनानाथमध्ये उपचारांना उशीर झाल्यामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, असा ठपका यापूर्वीच्या आरोग्य संचालक यांच्या चौकशी समितीने ठेवला होता. याशिवाय धर्मादाय सह आयुक्तांच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाने 35 कोटी 48 लाखांच्या धर्मादाय निधीचा वापरच केला नसल्याचे समोर आले होते. तर पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीनेही वेळेत उपचार न मिळाल्याने मेंदूला प्राणवायुचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला होता.
यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे पत्र ससून रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार ससून रुग्णालयाने त्यासाठी चौकशी समिती तयार करून त्या मार्फेत तनिषा भिसे ज्या ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या त्या सर्व रुग्णालयांची चौकशी केली तसेच त्यांचे उपाचाराचे कागदपत्रे तपासली. यात महिलेच्या उपचारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय किंवा तेथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याबाबत उल्लेख नाही, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.