BJP MLA Laxman Jagtap
BJP MLA Laxman Jagtap sarkarnama
पुणे

Laxman Jagtap Death news update : तडफदार नेतृत्व काळाने हिरावले: एकनाथ शिंदे

सरकारनामा ब्युरो

Laxman Jagtap News : "नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.दरम्यान,दुपारी अडीच वाजता ते पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे जगतापांच्या अंत्यदर्शनासाठी येणार आहेत.

आ.जगताप यांचे कर्करोगाने आज बाणेर येथील रुग्णालयात सकाळी निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना कर्करोगानेच निधन झालेल्या पुण्यातील कसबापेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील घरी पावणेचार वाजता जाऊन टिळक कुटुंबियाचे सांत्वन करणार आहेत.

आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

दरम्यान,पिंपरी-चिंचवड महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता आपली सर्व कार्यालये आज बंद ठेवून माजी महापौर आणि शहरातील विद्यमान आमदार जगताप यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आजचे सर्व कार्यक्रमही पालिकेने रद्द केले आहेत.तर, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनजागर यात्रेची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने आज आयोजित केलेली पत्रकापरिषदही रद्द केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT