Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest News Sarkarnama
पुणे

Shiv sena : ‘नवमर्द’ शिंदे गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी ; शिवसेनेचं टीकास्त्र

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून आज केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिवसेनेनं (shiv sena) टीकेचे बाण सोडलं आहेत. "भाजपला मेहबुबा आजही चालतात, पण हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रवादी शिवसेना संपून जावी असा त्यांचा उद्योग आहे. काश्मीरात आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने फुटिरांनाच भाजप महाबळ देत आहेत," असा आरोप शिवसेनेनं केला आहे. (Shiv sena news update)

"भारतीय जनता पक्ष व त्यांचे केंद्रातील सरकार कश्मीरचा झेंडा फडकविणाऱ्या भाजपच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांवर काय कारवाई करणार? एका बाजूला मोदी सरकार सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत अशा आपल्या राजकीय विरोधकांवर खोटय़ा-बनावट कारवाया करून कर्तव्यदक्षतेचा आव आणीत आहे," अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

"कायद्याचे बडगे फक्त तुमच्या राजकीय विरोधकांची नरडी बंद करण्यासाठीच आहेत, हे एकदा स्पष्ट सांगा. एक देश, एक संविधान, एक निशाण हाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा मंत्र असायला हवा. त्याला छेद देण्याचे काम कश्मीरात घडले आहे. भारतीय जनता पक्षाला मेहबुबा आजही चालतात, पण हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी शिवसेना संपून जावी, असा त्यांचा उद्योग आहे. कश्मीरातही ते फुटिरांनाच बळ देत आहेत व महाराष्ट्रातही ते फुटिरांनाच महाबळ देत आहेत, तेसुद्धा हिंदुत्वाच्या नावाने. यासारखे ढोंग ते कोणते? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही भाजपची वैयक्तिक चळवळ झाली आहे," अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

मोदी-शहा गप्प कसे?

स्वातंत्र्यलढय़ात मोठे योगदान दिलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’लाच सीलबंद करून ‘ईडी’वाल्यांनी त्यांचा झेंडा तेथे फडकवला. या सीलबंद कारवाईनंतर सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील घरासमोरील पोलिस बंदोबस्त वाढवला, पण कश्मीरचा ध्वज फडकवून देशालाच आव्हान देणाऱ्याृ मेहबुबांबाबत केंद्र सरकारचे शेपूटघाले धोरण का? याचे उत्तर देशाला मिळायला हवे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सध्या जे राजकीय उत्सवी स्वरूप चालवले जात आहे ते त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो, पण मोदींच्या राज्यात एक महिला पुढारी फुटीरतेचा ध्वज फडकवूनही मोदी-शहा गप्प कसे? असा सवालही मुखपत्रातून करण्यात आला.

काय म्हटले आहे 'सामना'च्या अग्रलेखात..

यासारखे ढोंग ते कोणते?

कायद्याचे बडगे फक्त तुमच्या राजकीय विरोधकांची नरडी बंद करण्यासाठीच आहेत, हे एकदा स्पष्ट सांगा. एक देश, एक संविधान, एक निशाण हाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा मंत्र असायला हवा. त्याला छेद देण्याचे काम कश्मीरात घडले आहे. भारतीय जनता पक्षाला मेहबुबा आजही चालतात, पण हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी शिवसेना संपून जावी असा त्यांचा उद्योग आहे. कश्मीरातही ते फुटिरांनाच बळ देत आहेत व महाराष्ट्रातही ते फुटिरांनाच महाबळ देत आहेत, तेसुद्धा हिंदुत्वाच्या नावाने. यासारखे ढोंग ते कोणते? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही भाजपची वैयक्तिक चळवळ झाली आहे.

केसरकर, सामंत, भुसे यांना न्यायला हवे

कधीकाळी भाजपच्या गळय़ात गळा घालून राजकारण करणाऱ्या, फुटीरतावादाचे विष आजही पेरणाऱ्या आणि आपल्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर ‘कश्मीर’चा ध्वज फडकविणाऱ्या मेहबुबांना हात लावण्याची हिंमत केंद्रातील सरकारमध्ये नाही. हिमतीचेच म्हणायचे तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पाकने गिळलेल्या आमच्या कश्मीरमध्ये पाऊल ठेवायला हवे होते. सोबत महाराष्ट्रातील नवमर्द शिंदे, केसरकर, सामंत, भुसे यांना न्यायला हवे होते. भाजपच्या नादास लागून शिवसेनेत फूट पाडल्यापासून या ‘नवमर्द’ गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या सुरसुरी फुटीर गटासह पाकव्याप्त कश्मीरात पाऊल ठेवून देशासमोर आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे.

महेबुबांच्या डीपीवर काश्मिरी ध्वज

आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व 80 हजार वर्ग फूट जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटक करण्यातच धन्य धन्य मानीत आहोत. चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT