Eknath Shinde-Shivajirao Adhalrao patil
Eknath Shinde-Shivajirao Adhalrao patil Sarkarnama
पुणे

अजितदादांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; आढळरावांना विशेष निमंत्रण

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच मंजूर विकासकामे रद्द करण्याच्या राजकीय घमासानामध्ये छत्रपती संभाजी महाराज जागतिक दर्जाचा स्मारक काम रद्द हा वादाचा मुद्दा ठरला होता. २७० कोटी निधीतून हे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याच्या कामावरुन शाब्दीक जुगलबंदी घडत होती. या मुद्द्याला एक महिना उलटत नाही तोच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच कामासाठी खास प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांचेसमवेत स्वतंत्र बैठक उद्या गुरुवारी (ता.१५) मुंबईत बोलावली आहे. विशेष म्हणजे बैठकीला शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. आढळराव यांना थेट बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेतच स्थान दिले आहे.

महाआघाडी सरकार पायउतार होताना मंजूर केलेल्या कामांना थेट रद्द करण्याचा शिंदे-फडणवीस सराकरने एककलमी कार्यक्रम राबविला होता. यात सर्वात संवेदनशील विषय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ हे जागतिक दर्जाचे बणविण्यासाठी महाआघाडी सरकारने २६९ कोटी २४ लाख रुपयांची मंजुरी दिली होती. तेच काम शिंदे-फडणविसांनी रद्द केले. यावर तात्काळ सरकारच्या वतीने शिंदे आणि फडणवीसांनी खुलासा करीत, आपले सरकार हिंदूहिताचे असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज समाधीचे हे प्रस्तावित काम रद्द न करता त्याचा सुधारीत आराखडा आम्ही करीत आहोत, असे त्यांनी जाहीर केले.

यावर शिरुर-हवेलीचे मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांनीही थेट आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी यासंबंधी आपला स्वतंत्र पाठपूरावा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरू केला असल्याचे सांगितले. याच अनुषंगाने विषयाला केंद्रस्थानी ठेवून उद्या (ता.१५) मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक आयोजित केली असून, त्यासाठी प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.

दरम्यान शिरुरमधील एकूण पाच कामांना उद्या मंजुरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज भव्य समाधीचे कामासह खेड (ता.खेड) पंचायत समिती इमारतीच्या बांधकामावरुन जे काही गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे. त्याबाबत ग्रामविकास विभागाच्या मूळ मंजुरीनुसार पूर्वी केलेल्या नियोजित जागेवरच सदर काम मंजूर करुन त्याचा कार्यारंभ करणे, खानापूर (ता.जुन्नर) येथे हिरडा प्रक्रीया उद्योग सुरू करणे, आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथे बिबट सफारी प्रकल्प प्रारंभ करणे व पूर (ता.जुन्नर) येथील कुकडेश्वर मंदिर जतन संवर्धनसाठी तात्काळ निधी मंजुरी आदी विषय उद्या दुपारी बारा वाजता होणा-या बैठकीत चर्चेसाठी नियोजित आहे. बहुतेक वरील सर्वच कामांना मंजुरी मिळेल, अशी स्थिती असल्याचे आढळराव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT