omicron
omicron Sarkarnama
पुणे

ओमीक्रॉनची राज्यात या शहरावर 'संक्रात', एका दिवसात आढळले २९ रुग्ण

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमालीची वाढत चालली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानूसार काही निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) हद्दीत कोरोनाने कहर केला असून त्यातही ओमीक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीएंटचा शिरकाव मोठ्या प्रमाणात या शहरात झाल्याने हे शहर ओमीक्रॉनचे हॉटस्पॉट बनले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २४ तासात २९ नवे ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले. त्यामुळे ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या आजपर्यंत शंभरच्या घरात (९३) गेली. दरम्यान, संक्रांतीच्या दिवशी, कोरोनाची शहरावर 'संक्रात' आल्यासारखी स्थिती वाढलेल्या रुग्ण संख्येतून दिसून आली. दोन हजार ५६२ नवे रुग्ण आढळले. तर, एका रुग्णाचा बळी गेला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या तिसऱ्या लाटेतील कोरोनामुळे पंधरवड्यापूर्वी फक्त काही शेकड्यांत असलेली सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आता साडेबारा हजाराच्या पलिकडे (१२,५१५) गेली आहे.

नव्या ओमीक्रॉन रुग्णांत १९ पुरुष आणि दहा महिला आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे त्यापैकी एकही परदेशातून आलेला नाही. तसेच ते परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातही आलेले नाहीत. रँडम तपासणीत त्यांना ओमीक्रॉन झाल्याचे दिसून आले. काल (ता.13 जानेवारी) दोन ओमीक्रॉनसह दोन हजार २७७ कोरोना रुग्ण शहरात आढळले होते. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यात आज आणखी एकाची भर पडल्याने बळींचा एकूण आकडा चार हजार ५२८ झाला आहे.

दरम्यान, शहरात गेल्या २४ तासात अडीच हजारावर नवे रुग्ण मिळाले आले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण त्याच्या निम्मेही (९९४) नाही. तर, एकूण रुग्णांचा आकडा हा आता तीन लाखाच्या घरात (२,९४,८२३) गेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT