PCMC Politics:  Sarkarnama
पुणे

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड भाजपला धक्का; शंकर जगतापांच्या शहराध्यक्ष निवडीचा वाद पेटणार ?

BJP Politics: शंकर जगताप यांची नियुक्ती झाली. यानिवडीला त्याच दिवशी पक्षातूनच त्यांना विरोध झाला होता

उत्तम कुटे: सरकारनामा

PCMC BJP Politics : तीन दिवसांपूर्वी (ता.१९) भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी पक्षाच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची नियुक्ती झाली. यानिवडीला त्याच दिवशी पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी कडाडून विरोध करीत पक्षात परिवारवाद रुजल्याचा घरचा आहेर दिला होता. आता हा विरोध आणखी वाढत चालला असून त्यातून शहर भाजपमध्ये राजकीय भूकंप होतो की काय,अशी चर्चा आहे.

शंकर जगतापांची निवड म्हणजे जगताप कुटुंबाला झुकतं माप असून यातून 'परिवारवाद' दिसून येतो, अशी तोफ थोरातांनी डागली होती. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी यांना पोटनिवडणुकीत पक्षाने संधी दिली.त्यानंतर त्यांचे बंधू शंकर यांना भाजपने प्रदेश पातळीवर (निमंत्रित सदस्य) घेतले. संघटनेत त्यांना अवघे वर्ष झाले नसताना आता शहराध्यक्षपदी त्यांची निवड केली.एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली गेली.

यातून पक्षाच्या धोरण, तत्वांना तिलांजली दिली गेली. शहरातील जुन्या व एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हा निर्णय न पटण्यासारखा आहे. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवून पक्षवाढीसाठी सतत झटणाऱ्यांची त्यामुळे घुसमट होत आहे, अशी लेखी नाराजी थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांनी जगतापांच्या अध्यक्षपदाला आज जाहीर विरोध केला. त्यातून शहराध्यक्ष निवडीवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगतापांच्या अध्यक्षपद नियुक्तीला शहरातील पक्षाच्या २५ माजी नगरसेवकांचा विरोध असल्याचा दावा `सरकारनामा`शी बोलताना आज काटेंनी केला. दोन दिवसांत आम्ही हे सारे नगरसेवक बैठक घेणार आहे. नंतर येत्या सोमवारी वा मंगळवारी उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे काटे यांनी सांगितले.

थोरात यांच्याप्रमाणे काटे हे ही अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छूक होते.तशी मागणीही त्यांनी पक्षश्रेष्टीकडे केली केली. मात्र, ती मान्य न झाल्याचे तेच नाही, तर चिंचवड मतदारसंघातील त्यांच्या काही समर्थक नगरसेवकांचा गट तीव्र नाराज झाला आहे. पिंपरी महापालिकेत गट टर्ममध्ये काटेंना डावलले गेले होते. महापौर वा स्थायी समिती सभापतीपदासाठी ते तीव्र इच्छूकच नाही, तर दावेदार असतानाही त्यांना ते पद देण्यात आले नव्हते. तरीही ते पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिले. आता, मात्र अध्यक्षपदापासूनही वंचित ठेवले गेल्याने त्यांच्या नाराजीचा अखेर स्फोट झाला. किती दिवस वाट पहायची अशी विचारणा त्यांनी केली. २०१७ ला भाजपला पिंपरी पालिकेत प्रथमच सत्तेत येण्यात आमचाही खारीचा वाटा होता, असे ते म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT