Ajit Pawar News Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजितदादा दीड वर्षापूर्वीचे विधान खरे करणार : 'माळेगाव'चे अध्यक्ष तावरे वगळून इतर होणार...

कल्याण पाचांगणे

Sugar Factory News : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील माळेगाव सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बहुतांश वेळा तावरे आडनावाचेच झाले आहेत. आता पुन्हा कारखान्याचे अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा बारामती (Baramati) तालुक्यात रंगली आहे. त्या चर्चेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दीड वर्षापूर्वीच्या विधानाची पुन्हा प्रकर्षाने आठवण झाली आहे.

माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद यापुढे इतर आडनावालाही मिळू शकते, असे भाष्य दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे येत्या शनिवारी (ता. २३ सप्टेंबर) अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांच्या जागी कोणाला संधी मिळते, याकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी अॅड. केशवराव जगताप, योगेश जगताप, मदनराव देवकाते, सुरेश खलाटे, नितीन सातव यांची नावे चर्चेत आहेत, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी देवकाते, पंकज भोसले यांचे नावे पुढे आली आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी साडेतीन वर्षांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्याकडून सत्ता हिसकावली होती. कारखान्यावर राष्ट्रवादीची सत्ता आल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे यांना ८ मार्च २०२० पासून अध्यक्षपदी संधी देण्यात आली होती. तावरे यांनी आतापर्यंत तब्बल १८ वर्षे कारखान्याच्या अध्यक्षपदी काम केले आहे.

बाळासाहेब तावरे यांच्यानंतर पवार विरोधी गटाचे नेते, माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे हे साडेबारा अध्यक्ष होते. रंजन तावरे आणि संपतराव तावरे यांनी प्रत्येकी पाच वर्षे कारखाना अध्यक्ष म्हणून सांभाळला आहे. कारखाना निवडणुकीत तोच धागा पकडून अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर काखान्याच्या सभेत बोलताना 'माळेगावचा अध्यक्ष यापुढे इतर आडनावाचा असेल, हा माझा शब्द,' असे सांगितले होते. त्या विधानाची चर्चा आता माळेगाव कारखान्याच्या पट्ट्यात सुरू आहे.

सर्व समाजघटकांना माळेगाव कारखान्याच्या राजकारणात संधी देण्याचा, तसे नवीन सक्षम चेहरे तयार करण्याचा अजित पवारांचा उद्देश असू शकतो, असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी सांगितले. त्यातूनच आता अध्यक्षपदासाठी अॅड. केशवराव जगताप, योगेश जगताप, मदनराव देवकाते, सुरेश खलाटे, नितीन सातव यांची नावे चर्चेत आली आहेत.

सहकारी संस्था चालविण्याचा अनुभव अॅड. केशवराव जगताप यांच्या पाठीशी आहे. बारामतीचे नगराध्यक्ष म्हणून योगेश जगताप यांनी काम केले आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते म्हणून मदनराव देवकाते यांना ओळखले जाते. त्यांनी पुणे जिल्हा परिषद तसेच, जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून भरीव काम केले आहे. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून सुरेश खलाटे यांनी विश्वास मिळविला आहे.

देवगिरी इच्छुकांची वर्दळ; पण दादांच्या मनात कोण ?

माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद आपल्याच गटाकडे यावे, यासाठी बारामती तालुक्यातील इच्छुकांनी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर गर्दी केली आहे. अनेक इच्छूक दादांना भेटण्यासाठी मुंबई (Mumbai) वारी करीत आहेत. पण दादा कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकणार याकडे बारामतीचे लक्ष असणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT