Bala Bhegade - Sunil Shelke Latest News
Bala Bhegade - Sunil Shelke Latest News Sarkarnama
पुणे

पाणी योजनेची अंमलबजावणी दूरच राहिली, आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयबाजी रंगली...

उत्तम कुटे

पिंपरी : मावळ (Maval) (जि.पुणे) तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराच्या ३९ कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा योजनेवरून तालुक्याच्या आजी-माजी आमदारांत श्रेयाचे राजकारण रंगले आहे.

तत्वत मंजुरीनंतर नुकतीच तांत्रिक मंजुरी मिळालेली ही योजना प्रत्यक्ष सुरु होईपर्यंत मोठा कालावधी लागणार आहे. म्हणजे नव्या योजनेचे पाणी मिळण्यास अवकाश असतानाच त्यावरून श्रेयाची जोरदार लढाई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांच्यात सुरु झाली आहे. (Bala Bhegade - Sunil Shelke Latest News)

वडगावच्या या पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी आ. शेळकेंमुळे मिळाल्याचे वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे व सभापती (पाणीपुरवठा) राजेंद्र कुडे यांनी परवा पत्रकापरिषद घेऊन सांगितले होते. त्यावर आपल्या विशेष प्रयत्नांतून या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाल्याचा दावा भेगडे यांनी काल केला. त्याबाबत २ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जेमतेम दहा दिवसांत चाळीस कोटीच्या पाणीयोजनेला टेक्निकल मंजुरी घेण्याच्या त्यांच्या दाव्यामुळे खमंग चर्चा सुरु झाली आहे. आमदार शेळकेंनी या दाव्याची खिल्ली उडविली. कुठल्याही योजनेचा प्रस्ताव ते मंजुरी या प्रवासाला काही महिने, तर अनेकदा काही वर्षे लागतात. वेळखाऊ आणि किचकट हे काम असते. त्यासाठी पाठपुरावाही करावा लागतो. मगच मंजूर होऊन सदर योजना प्रत्यक्षात येते, असे ते म्हणाले. त्यामुळे पत्र दिले आणि दहा दिवसांत मान्यता मिळाली असे होत नाही.परिणामी मी वर्षभरापासून पाठपुरावा करीत असलेल्या या योजनेचे कुणी श्रेय घेऊ नये, तोंडघशी पडाल,असा हल्लाबोल त्यांनी भेगडेंचे नाव न घेता केला.

त्यांच्या या म्हणण्याला वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. कुठलेच सरकार आठ-दहा दिवसांत कुठल्याच योजनेला मंजुरी देऊ शकत नाही,असे ते म्हणाले. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांना भेटून आम्ही (आ.शेळके, मी व इतर) वडगावच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेला तत्वत मंजुरी घेतली होती,असे त्यांनी सांगितले.

तसेच सध्याची शहराची पाणीपुरवठा योजना ही वडगावमध्ये ग्रामपंचायत असतानाची चाळीस वर्षे जुनी आहे. दरम्यानच्या काळात मोठा विकास आणि लोकसंख्यावाढ झाली. ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्याने पाणी कमी पडते आहे. म्हणून पुढील तीस-चाळीस वर्षांचा विचार करून नव्या मोठ्या पाणी योजनेची मागणी आम्ही केली होती, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर जवळ जॅकवॉल बांधला जाणार आहे. तेथून पाणी लिफ्ट करून ३०० मी.मी व २०० मी. मी व्यासाच्या पाईपलाईनमधून वडगावनजीकच्या शिंदे टेकडी व संस्कृती आणले जाईल. तेथील ते फिल्टर होऊन पुरवले जाणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भेगडेंच्या पत्रावर नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांनी प्रस्ताव सादर करा,असा शेरा त्याच दिवशी (ता.२) दिला. त्यानंतर नगरविकास विभागाने अमृत योजनेत या योजनेचा प्रस्ताव मागविण्यास सांगितले. त्यानुसार दोन दिवसांनी (ता.४) वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांना पत्र देण्यात आहे. त्यात सदर योजना ही अमृत तथा महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथ्थान महाअभियानात विचारात घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी ग.द. आलेवाड यांनी म्हटले आहे. तांत्रिक मंजूरी दिली वा निधीबाबत त्याच कसलाही उल्लेख नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT