Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
पुणे

नाशिक फाटा-राजगुरूनगर दोन तासाचा प्रवास आता होणार 20 मिनिटात...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : तळेगाव-चाकण-शिक्रापूरनंतर आता नाशिक फाटा ते राजगुरूनगर (खेड) हा २८ किलोमीटर (Nashik Fata to Rajgurunagar corridor project) लांबीचा पुणे-नाशिक महामार्गही नागपूर-वर्धा या महामार्गाच्या धर्तीवर एलिव्हेटेड तथा उन्नत होणार आहे. त्यामुळे या मार्गात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. तसेच सध्या दीड-दोन तास लागणाऱा हा प्रवास केवळ २० मिनिटात पूर्ण करता येणार आहे, अशी माहिती पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली. तसेच नाशिक, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, मंचर येथील प्रवाशांना अत्यंत सहजपणे नाशिकफाट्यापर्यंत पोहोचता येणार आहे.

नाशिकफाटा ते राजगुरुनगर हा महामार्ग एलिव्हेटेड करण्यासाठी मेदगे यांनी प्रथम गेल्यावर्षी २६ ऑगस्टला पहिले पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) दिले होते. त्यासाठी आपणही सकारात्मक पुढाकार घेतल्याचा दावा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनीही केला आहे. मात्र, त्यावरून वादंग होण्याची चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याकडून या दाव्यावर हल्लाबोल होण्याची दाट शक्यता आहे.

पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा नुकताच (ता.१४ मार्च) दिल्लीत झालेल्या बैठकीत गडकरींनी घेतला. त्यात नाशिकफाटा-राजगुरुनगर महामार्ग उन्नत करण्याचा आदेश गडकरींनी दिला. मेदगे या बैठकीला उपस्थित होते. त्यात कात्रज-चांदणी चौक-नवले ब्रिज-रावेत-देहूरोड हा एनएच ४८ चा टापूही एलिव्हेटेड करण्यावर चर्चा झाली. तसेच भारतमाता २ अंतर्गत पुणे-बेंगलोर (बेंगळूरू) व पुणे-औऱंगाबाद हे दोन्ही महामार्ग हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे करण्यावर विचारविनिमय झाला. पुणे रिंगरोड आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर मल्टिलेअर करणे आणि तळेगाव येथे लॉजिस्टीक पार्क उभारण्यावर चर्चा झाली. तसे ट्विट स्वत: गडकरी यांनीच केले आहे. खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान येथे सीएसआर फंडातून सुरु असलेल्या विकासकामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

नाशिकफाटा-राजगुरुनगर महामार्गावर दुमजली उड्डाणपूल होणार आहे. त्याअंतर्गत सध्या खालील चारलेनचा मार्ग हा सहालेनचा होईल. तर, पहिल्या मजल्यावरही येण्याजाण्यासाठी प्रत्येकी तीन-तीन अशा सहा लेन असतील. दुसरा मजला हा प्रस्तावित नाशिकफाटा-चाकण मेट्रोसाठी असणार आहे. दरम्यान, नाशिक फाटा ते राजगुरूनगर या रस्त्याचे काम दोन टप्प्यात होणार होते. पहिला टप्पा नाशिक फाटा ते मोशी टोल नाका आणि दुसरा टप्पा मोशी टोल नाका ते चांडोली टोल नाका. दुसऱ्या टप्यातील कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. या कामात बारा व्हीयुपी, चार ओव्हरपास, चाकण मधील सव्वा दोन किलोमीटर व मोशी मधील तीन किलोमीटर असे दोन मोठे उड्डाणपूल बांधण्यात येणार होते. त्यामुळे वाहतुकीच्या गतीवर परिणाम होऊन वाहतूक संथ गतीने होणार होती. ही बाब मेदगे यांनी गडकरींच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर हा संपूर्ण मार्ग एलिव्हे़टेड करण्याचा आदेश त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT