Mahesh Landge, Srirang Barne News
Mahesh Landge, Srirang Barne News Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad : मंत्रिमंडळ विस्ताराचा आणखी एक मुहूर्त; पिंपरी-चिंचवडचे खाते उघडणार का?

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराला आता १९ जूनअखेरपर्यंतचा आणखी एक नवा मूहूर्त काल मिळाला. त्यातून पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) पहिल्यांदाच मंत्रीपद मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे उद्योगनगरीचे मंत्रिपदाचे खाते उघडणार का, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर तो राज्यातही होणार आहे. दोन्ही विस्तार हे शिंदे शिवसेनेसाठी (Shivsena) प्रामुख्याने होत आहेत. केद्रात त्यांच्या दोन खासदारांना मंत्रीपदं मिळणार आहेत. त्यात मावळचे श्रीरंगअप्पा बारणे (Srirang Barne) यांचे नाव चर्चेत आहे. राज्यात, तर शिंदे शिवसेना मंत्रिमंडळ विस्तारासाठी घायकुतीला आली आहे. त्यांचे अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कोटही शिवून घेतले आहेत.

सर्वोच्च न्यायालयानेही नुकतीच राज्य सरकारवरील टांगती तलवार दूर केल्याने आता हा विस्तार होऊ घातला आहे. त्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत भाजपचे देशातील दोन नंबरचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्याशी तीन तास चर्चा केली.

शाह, शिंदे, फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेत सध्याच्या राज्य मंत्रीमंडळात महिला नसल्याने त्यांना स्थान देण्याचे नक्की झाले. त्यामुळे किमान वा दोन महिला मंत्री आता राज्यात असू शकतात. त्याकरिता पुण्यातील भाजपच्या (BJP) महिला आमदारांचे नाव घेतले जात आहे. तसेच या विस्तारात तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरले आहे. तसे झाले, तर पिंपरी-चिंचवडचा प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे. त्यातून पिंपरी-चिंचवडकरांच्या जोडीने भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे समर्थकांच्याही आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

शहर मंत्रिपदापासून अजून वंचितच आहे. त्यात महापालिका निवडणूक होऊ घातली आहे. त्यादृष्टीने ताकद देण्यासाठी भाजप लांडगेंना ही संधी देऊ शकते. तसेच फडणवीस यांच्या अत्यंत गुड बुकातील आहेत. यापूर्वी मावळला मंत्रिपद मिळालेले आहे. मात्र, तीन आमदार असूनही उद्योगनगरी त्यापासून दूरच राहिलेली आहे. हा बॅकलॉग भरून काढावा, अशी शहरवासियांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही भावना आहे. ती पूर्ण होते का हे आता शिवसेनेच्या वर्धापनदिनापर्यंत (१९ जून) कळणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT