Shirur March Sarkarnama
पुणे

आमदार अशोक पवारांना धमकी : शिरूरमधील वातावरण तापलं; सर्वपक्षीयांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या नामर्दाचा शोध पोलिसांनी लावावा.

नितीन बारवकर

शिरूर : एका निनावी पत्रादवारे शिरूर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या जीविताबद्दल आक्षेपार्ह टीपण्णी केल्याच्या निषेधार्थ आज (ता. १८ ऑक्टोबर) येथील विविध संस्था संघटनांनी व राजकीय पक्षांनी शिरूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. या प्रकाराचा निषेध नोंदवितानाच आमदार पवार यांना सरकारने संरक्षण पुरवावे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. (Threat to MLA Ashok Pawar: All party workers march on police station)

शिरूर शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह़ विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रविवारी (ता. १७ ऑक्टोबर) आणि सोमवारी (ता. १८ ऑक्टोबर) दोन पानी निनावी पत्र आले असून, त्यात आमदार अड. पवार, नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांबाबत आक्षेपार्ह टीपण्णी करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी शहरात नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा भरदिवसा खून झाला होता. त्या पार्श्वभूमीवर, आमदार पवार यांचा महेंद्र मल्लावसारखा कार्यक्रम होईल, असा आक्षेपार्ह मजकूर या पत्रात टाकण्यात आला आहे. आमदार पवार यांच्याबाबत या पत्रात आणखीही आक्षेपार्ह विधाने असलेल्या या पत्राचा व त्यातील मजकूराचा निषेध नोंदविण्यासाठी सकाळी जुन्या नगर परिषदेजवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व विविध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजप, रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह शहर व तालुक्यातून विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलकांनी पोलिस ठाण्यासमोर काही काळ ठिय्या मारला. या वेळी रवीबापू काळे यांनी या निनावी पत्राबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. उकीरड्यावर जन्म झालेल्या नामर्द अवलादींचा हा उद्योग असला तरी कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. शिरूर शहरातील १८ पगड जातीचे लोक पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने नांदत असताना काही विकृत शक्ती या एकतेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शांतता भंग करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. आमदार पवार व सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या समन्वयातून भरीव कामांतून शहराचा रचनात्मक विकास चालू असताना त्याला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या एकीच्या बळावर हाणून पाडला जाईल, असे ते म्हणाले. पोलिस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत आमदार पवार यांना तातडीने संरक्षण पुरवावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

काही विषारी शक्ती आमदार पवार यांच्याबाबत गरळ ओकत असतील, त्यांच्यावर छुपे हल्ले करीत असतील तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भिंत म्हणून आडवे उभे राहतील, असे विनोद भालेराव म्हणाले. निनावी पत्रातून आमदार व प्रतिष्ठीत लोक, कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह लिखान करणाऱ्या नामर्दाचा शोध पोलिसांनी लावावा. तालुक्यातील महिला त्याला बांगड्या भरतील, असे विद्या भुजबळ म्हणाल्या. विरोध विचाराने करा. विकासाला उत्तर विकासानेच दिले गेले पाहिजे. चुकीच्या प्रवृत्तीला कुणीच थारा द्यायला नको, असे तुकाराम खोले म्हणाले. निनावी पत्रादवारे समाजमन विचलित करू पाहणाऱ्या, लोकप्रतिनिधींना धमकावणाऱ्या, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीला शोधून कठोर शासन करावे, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करताना यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी जगदाळे यांनी केली.

पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या पत्रातून लोकप्रतिनिधींना धमकीवजा भाषेचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल व सखोल चौकशी करून अशा प्रवृत्तींचा छडा लावला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT