kunal tilak - ravindra dhangekar
kunal tilak - ravindra dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणाऱ्या धंगेकरांचं टिळक कुटुंबियांनी केलं अभिनंदन!

सरकारनामा ब्यूरो

Kunal Tilak On Kasba By Election : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयश्री खेचून आणत इतिहास घडवला आहे. धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. कसबा मतदारसंघात तब्बल २८ वर्षानंतर भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. एकीकडे कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागलेला असतानाच दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांनी पराभवावर पहिली प्रतिक्रिया देतानाच धंगेकरांचं अभिनंदन देखील केलं आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळकांचे चिरंजीव व भाजपचे प्रवक्ते कुणाल टिळकां(Kunal Tilak) नी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या पराभवावर भाष्य केलं आहे.

टिळक म्हणाले, जे काही मतदान झालं. त्यामधून जो काही ११ हजारचा आकडा येतोय त्याचा कुठंतरी अभ्यास होणं गरजेंचं आहे. ते एका दिवसांत शक्य नाही. कोणत्या बूथ, प्रभाग,नगरसेवकांच्या मतदारसंघात आम्ही कुठे मतदान कमी पडलो याचा अभ्यास पक्षातील वरिष्ठ मंडळी करतील याचा मला विश्वास आहे. आम्ही कुठे कमी पडलो असं मला वाटत नाही, कारण आम्ही अगदी जोमाने प्रचार केला. प्रत्येक कार्यकर्ता, प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री यांच्यासह सर्वांनीच या निवडणुकीत जोरदारपणे काम केलं. पण त्याचं मतपेटीत रुपांतर करण्यात मला अपयश आलं असंही टिळक म्हणाले.

पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान करायचं भाजपचं जे लक्ष्य होतं तेही आम्ही पूर्ण केलं. पण, मतपेटीत त्याचा परिणाम झाला नाही. त्या मागची कारणं विविध असू शकतील. मात्र, पहिल्या दिवसांपासून हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यात पर्सेप्शनची लढाई पाहायला मिळाली. पर्सेप्शनची लढाई व आणि माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर धंगेकराचा जो प्रचार सुरु होता त्यात भाजप कुठंतरी कमी पडली असं माझं विश्लेषण आहे. कॉंग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा देत असताना भाजप कुठं कमी पडलं हे पाहावं लागेल असंही टिळक म्हणाले आहेत.

तसेच रवींद्र धंगेकर यांनी मुक्ताताई टिळकांचे आशीर्वाद होते म्हणून निवडून आलो या विधानावर टिळकांनी प्रतिक्रिया दिली आहे. टिळक म्हणाले, मुक्ता टिळकांचे नगरसेवक, महापौरपद, आमदारकीच्या कार्यकाळात पक्षातील नेतेमंडळीसंह विरोधीपक्षातील लोकांशी देखील जे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्या वाक्यात वेगळं काही असेल असं मला वाटत नाही असंही टिळक यावेळी म्हणाले.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबातच ही उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता होती. यात शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक यांच्यापैकीच कुणाला तरी उमेदवारी दिली जाईल अशी स्थिती होती. मात्र त्यावेळी भाजपकडून त्यांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर टिळक कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा होती. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टिळक कुटुंबियांची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरावे लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT