<div class="paragraphs"><p>PDCC bank</p></div>

PDCC bank

 

Sarkarnama

पुणे

PDCC Bank : अजित पवारांसह १४ जण बिनविरोध, ७ जागांवरचे भवितव्य आज मतपेटीत

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (PDCC bank) आज मतदान होत आहे. बँकेच्या एकूण २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर ७ जागांसाठी आज मतदान होत आहे. यात आज आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील आज बारामती दौऱ्यावर असून ते मतदान करणार आहेत.

बॅंकेच्या २१ संचालक पदांपैकी २३ डिसेंबर या अर्ज माघारी घेण्याच्या अखरेच्या दिवसापर्यंत १४ जण बिनविरोध झाले आहेत. बिनविरोध झालेल्या जागांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यासह आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचा समावेश आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या ४ जानेवारी रोजी होणार आहे.

उर्वरित ७ जागांसाठी आज मतदान होणार आहे. यात तालुकास्तरीय 'अ' वर्ग मतदारसंघातील हवेली, मुळशी आणि शिरूर या ३ जागांचा समावेश आहे. या तिन्ही मतदारसंघात दुरंगी लढती होत आहे. शिरूरमधून आमदार अशोक पवार यांच्या विरोधात आबासाहेब गव्हाणे, हवेलीतून बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश म्हस्के यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच विकास दांगट यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर मुळशी तालुका मतदारसंघात बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी कॉंगेसचे सुनील चांदेरे यांच्यात लढत होत आहे.

'क' वर्ग मतदारसंघातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते प्रदीप कंद यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले रिंगणात आहेत. 'ड' वर्ग मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दिगंबर दुर्गाडे यांच्या विरुद्ध दादासाहेब फराटे निवडणूक लढवत आहेत.

या जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाच्या दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. या दोन जागांसाठी तीन महिला निवडणूक रिंगणात उरल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन आणि भाजपच्या एका महिलेचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंगेसच्या निर्मला जागडे, पूजा बुट्टे आणि भाजपच्या आशा बुचके या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. ४ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT