पुणे : कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पारंपारिक पदवी अभ्यासक्रमांसाठी बारावीनंतर थेट प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी कोणतीही प्रवेश परिक्षा (सीईटी) घेण्यात येणार नाही. मात्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी नेहमीप्रमाणे ‘सीईटी’ पार पडेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पुण्यात दिली.(Traditional degree courses do not have CET; Direct Admissions)
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले,‘‘ बीए, बी.कॉम, बीएस्सी, आदी पारंपारिक अभ्यासक्रमांसाठी कोणतीच सीईटी घेण्यात येणार नाही. त्यांना थेट बारावीच्या गुणांच्या आधारे थेट प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या स्वायत्त संस्था अशा सीईटी आजवर घेत होत्या.त्यांच्याकडूनही संबंधित सीईटीसाठी कालावधी निश्चित करण्यात येईल. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, आर्किटेक्चर, औषधनिर्माणशास्त्र आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नियोजन बद्ध पद्धतीने सीईटी होईल.’’ कोरोनाचा प्रादुर्भाव, राज्यातील अतिवृष्टी, तसेच प्रवेश परीक्षेसाठी लागणारा कालावधी आणि तयारी पाहता पारंपारिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेणे व्यवहार्य ठरणार नाही, असेही सामंत यांनी सांगितले.
महाविद्यालये सुरू करण्याला प्राधान्य
पुढील शैक्षणिक वर्ष विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘जिल्हास्तरावर कोरोनाचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने, कोरोना संबंधी काळजी घेत महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याला आमचे प्राधान्य राहील. वेळ आली तर विद्यार्थ्यांचे लसीकरण करून महाविद्यालये सूरू करण्यात येतील. जिथे कोरोनाचा प्रसार जास्त आहे. अशा ठिकाणी मात्र योग्य तो निर्णय घेतला जाईल.’’
प्रवेश क्षमता वाढविणार
बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्णांची टक्केवारी वाढली असून, त्यासाठी पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमताही वाढविणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे, नागपूर नाशिक या विभागातील अशासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा ओढा पाहता. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता अपवादात्मक स्थितीत महाविद्यालयांतील मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा २० टक्के वाढ करण्याचे शासन स्तरावरून आदेश देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. अकृषी विद्यापीठांनी आपल्या स्तरावरून विद्यापीठांच्या मंजुरीच्या शिफारशींसह शासनाला सादर करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
थोडक्यात
- बारावीच्या निकालावरच पारंपारिक अभ्यासक्रमांना थेट प्रवेश
- स्वायत्त महाविद्यालयांची आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटीसाठी कालावधी निश्चित
- व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी केंद्रांची संख्या वाढविणार
- प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल यासाठी कटिबद्ध
- कोरोनाच्या स्थितीनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो.
व्यावसाईक सीईटीच्या संभाव्य तारखा
१) व्यवस्थापन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमएचएमसीटी : २६ ऑगस्टपासून
२) तंत्रशिक्षण प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी २०२१) : पहिले सत्र : ४ ते १० सप्टेंबर, दुसरे सत्र : १४ ते २० सप्टेंबर
३) शिक्षणशास्त्रातील व्यावसायिक प्रवेश परिक्षा (बीएबीएड, एमएड आदी) : २८ ऑगस्टपासून
४) एलएलबी आणि बी.एड. ईएलसीटी : १७ सप्टेंबर पासून
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.