पुणे महानगरपालिका भवन
पुणे महानगरपालिका भवन  सरकारनामा
पुणे

पुणे महापालिकेपुढे पेच : गडकरींचे ऐकावे तर २५ कोटींचा वाढणार खर्च

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

पुणे : सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या रचनेत बदल करून दुमजली उड्डाणपूल उभारण्याची सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. या मलेशियन टेक्नॉलॉजीचा वापर सिंहगड रस्त्यावर करणे अवघड असल्याचे समोर आले आहे, त्याचा वापर केल्यास तब्बल २५ कोटी रुपयांनी खर्च वाढणार आहे. त्यामुळे गडकरी यांनी दिलेल्या पर्यायाऐवजी महापालिकेच्या आधीच्या नियोजनाप्रमाणेच काम केले जाणार असून त्याची तयारी महापालिकने सुरू केली आहे.

धायरी, वडगाव, खडकवासला, हिंगणे, नऱ्हे या भागात जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग नसल्याने सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइन थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यात झाले होते. मात्र, हा पूल आणखी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो असे गडकरी यांनी सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने चाचपणी करण्यास सुरवात केली होती. यासंदर्भात गेल्या महिन्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेऊन याचा आढावाही घेतला होता.

राजाराम पूल ते फन टाइम थिएटर पर्यंत महापालिकेने एक उड्डाणपूल प्रस्ताविक केला आहे. यासाठी ११८ कोटी रुपये खर्च येणार आहे. पण याऐवजी मलेशियन तंत्रज्ञान वापरून या रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारता येईल. यामध्ये मेट्रोसाठीचे नियोजन करणे शक्य आहे. या तंत्रज्ञानामुळे पिलरची संख्या कमी होईल. हे काम ११८ कोटी मध्येच होईल, खर्च वाढणार नाही, त्यामुळे याचा विचार करा.’’ अशी सूचना केली होती.

नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने संबंधित सल्लागार कंपनीला सध्याचा आराखडा, मेट्रोची अलाइनमेंट व खर्चाचा तपशील पुरविला. यासंदर्भात महापालिकेचे अधिकारी व संबंधित कंपनी यांच्यात बैठक झाली. पिलरची संख्या कमी करताना उड्डाणपुलाची रुंदी कमी होणार नाही याकडेही महापालिकेने लक्ष दिले. या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर या रस्त्यावर ११८ कोटीमध्ये दुमजली उड्डाणपूल बांधणे शक्य नाही, तसेच मलेशियन तंत्रज्ञान याठिकाणी उपयुक्त होणार नाही. याचा उपयोग ज्या ठिकाणी पिलरसाठीचे फाउंडेशन जास्त खोल घ्यावे लागते अशा ठिकाणी केले जाते. विशेषतः उत्तर भारतात गाळाचे मैदान असल्याने नदीवरचे पूल बांधताना या तंत्रज्ञानाचा वापर होतो असा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे याचा उपयोग या पुलासाठी होणार नाही हे स्पष्ट झाले.

‘‘राजाराम पूल ते फनटाइम थिएटर हा उड्डाणपूल दुमजली करण्यासाठी चाचपणी झाली, पण यात खर्चातही वाढ होणार असल्याचे हा उड्डाणपूल होऊ शकणार नाही, असे बैठकीत झालेल्या चर्चेतून समोर आले आहे. त्यामुळे मुळ आराखड्यानुसार उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, असे बैठकीत ठरले. मात्र याबाबत आयुक्त अंतिम निर्णय घेतील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

उड्डाणपुलाचा मार्ग - राजाराम पूल ते फन टाइम थिएटर

लांबी - २१२० मीटर

रुंदी - १६.३ मीटर

कामाची मुदत : ३६ महिने

किती वाहनांसाठी उड्डाणपूल उपयुक्त - १.२५ लाख (रोज)

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT