Uday Samant|
Uday Samant| Sarkarnama
पुणे

Uday Samant Attack : शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटातील माजी मंत्री आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) यांच्यासह सहा पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अटक केल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही, असे नमूद करत न्यायालयाने सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी गेली. या गुन्ह्यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय हरिश्चंद्र मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन नारायण थोरात, राजेश बाळासाहेब पळसकर, संभाजी हनुमंत थोरवे, सूरज नथुराम लोखंडे आणि चंदन गजाभाऊ साळुंके यांनी अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक विशाल धनवडे व शहरप्रमुख गजानन थरकुडे यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सामंत यांचे वाहनचालक विराज विश्वनाथ सावंत (वय ३३, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्री कात्रज चौकात सभा झाल्यानंतर तेथून जाणाऱ्या सामंत यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली होती. त्या बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. पोलिसांना तपास करण्यासाठी योग्य ती मुदत देण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींपैकी कोणीही त्या दिवशी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT