Uddhav Thackeray Slams Eknath Shinde NEWS  sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंचा दावा घटनाबाह्य ; ठाकरे म्हणाले,'शिवसेनेत 'मुख्य नेता' हे पदच..'

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. "उद्या पैशांच्या जोरावर अशा पद्धतीने कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. पैशांच्या जोरावर मुख्यमंत्री बनणे चुकीचे आहे," असा टोला ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना बुधवारी लगावला. ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत पक्षप्रमुख हे पद मीच तयार केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून मी या पदावर काम करत आहे. आता जे सोडून गेलेत, त्यांनीच माझी या पदावर निवड केली आहे," "शिवसेनेत 'मुख्य नेता' हे पदच नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दावा हा घटनाबाह्य आहे," असे ठाकरेंनी सांगितले.

"निवडणूक आयोगाने मागणी केली त्याप्रमाणे आम्ही लाखो सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. केवळ गद्दारांनी दावा केला म्हणून पक्ष गोठवू नये. किमान आता तरी घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी," असे ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाकडे आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. "सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्याशिवाय निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सोळा आमदार हे अपात्र ठरणार..

"पक्ष हा दोन पातळीवर असतो. एक हा वैधानिक पातळीवर असतो, तर दुसरा हा रस्त्यावर असतो. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही, शिवसेना एकच राहणार, शिंदे गटाला मी शिवसेना मानत नाही," असे ठाकरे म्हणाले. "सोळा आमदार हे अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या पूर्वी निकाल देऊ नये," असे ठाकरे म्हणाले.

निवडणूक घेऊ द्या

"शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने घेऊ द्यावी," अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. "निवडणूक आयोगाची मागितलेली माहिती आम्ही त्यांना दिली आहे," असे ते म्हणाले.

उद्योगपतीही पंतप्रधान होतील..

कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. त्याच हेतूने शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर उद्या जगातले कोणीही एक दोन नंबरचे उद्योगपतीही आमदार, खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतील. त्या पक्षाला काही अर्थ नाही त्याचा गद्दारी म्हणतात, असही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT