Shivajirao Adhalrao - Uddhav Thackeray
Shivajirao Adhalrao - Uddhav Thackeray  Sarkarnama
पुणे

हकालपट्टीनंतर उद्धव ठाकरेंचा आढळरावांना फोन; व्यक्त केली हळहळ!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : हकालपट्टीच्या वृत्तानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सकाळी मला फोन केला होता. जे घडलं ते पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली, असे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी सांगितले. (Uddhav Thackeray's phone call to Shivajirao Adhalrao Patil)

माजी खासदार आढळराव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त सकाळी आले होते. त्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. या कारवाईमुळे ते प्रचंड व्यथित झाल्याचे दिसून आले.

आढळराव म्हणाले की, आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. सामना पेपर आणि न्यूज चॅनेलवर बातम्या पाहिल्या, त्या खऱ्या आहेत का? मला आधी वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करतंय. मात्र, मी स्वतः सामना पेपर वाचला आणि मलाच धक्का बसला. यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची, हेच समजत नव्हतं. शनिवारी रात्रीच माझं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छापर फेसबुक पोस्टबद्दल विचारलं होतं. ती खूप व्हायरल झाली आहे, असंही ते म्हणाले होते. त्यावर मी त्यांना स्पष्टपणं सांगितलं होतं की, ती पोस्ट टाकून मी काही चूक केली, असं मला अजिबात वाटत नाही.

कारवाईनंतर उद्धव ठाकरेंचा मला सकाळी फोन आला होता. जे घडलं ते पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली. पण, या कारवाईतून माझी राज्यभर बदनामी झाली, त्याचं काय? आज दिवसभर मी विचार करेन. हवं तर उद्धव ठाकरेंना भेटेन. मग पुढचा निर्णय ठरवूयात, असा सूचक इशाराही त्यांनी शिवसेना नेत्यांना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत आहेत. मी गेल्या अडीच वर्षांपासून त्यांना अंगावर घेतोय. आता फक्त आम्हाला गोळी मारायची बाकी होती. एकनाथ शिंदेंना समर्थन करण्याचा आणि न करण्याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून मला कोणत्याही पक्षाचा फोन आलेला नाही. शिवसेनेत आल्यापासून मी भाजपमध्ये जाणार, राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे. पण, त्यात आत्तापर्यंत तथ्य नव्हतं, यापुढे ही नसेल, असे सांगून त्यांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT